- आविष्कार देसाई
अलिबाग : राज्यामध्ये मराठी भाषेचा वापर सरकारी कामात केला जातो की नाही याची पाहणी करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र विधिमंडळाची मराठी भाषा समिती आली आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेत कार्यालयातील दर्शनी भागावर लावलेले फलक रातोरात मराठीत करून घेतले आहेत. या फलकावर रायगड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जेवढे जिल्हाधिकारी होऊन गेले आहेत त्यांचे नाव आणि त्यांचा कालावधी या फलकावर छापलेला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे समितीच्या डोळ््यात धूळफेक तर केली नाही ना अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात होती.
विविध राज्यांमध्ये त्यांचा राज्यकारभार हा त्यांच्या मातृभाषेतूनच केला जातो. मराठी भाषेला हजारो वर्षांची संस्कृती, वारसा लाभलेला आहे. परंतु अलीकडे सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषेव्यतिरिक्त इंग्रजी भाषाच जास्त प्रमाणात वापरात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून सरकारी कामकाज मराठीतूनच करण्याचा निर्णय अलीकडेच सरकारने घेतला होता.
सरकारी कार्यालयातील कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही, मराठी भाषेचा प्रसार, मराठी भाषेचा विकास करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याची माहिती घेण्यासाठी सरकारने महाराष्ट्र विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीचा दौरा रायगड जिल्ह्यात आखला आहे. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस ही समिती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक, जिल्हा पोलीस अधीक्षक या विभागाची पाहणी करणार आहे. समितीच्या प्रमुख भाजपाच्या आमदार प्रा.मेधा कुलकर्णी आहेत. समितीमध्ये सर्वपक्षीय १५ आमदारांचा समावेश आहे.हे फलक लावण्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेतून दोन अर्थ निघतात. एक मराठी भाषा समितीचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला आहे, अथवा मराठी भाषा समितीच्या डोळ््यात धूळफेक करण्यासाठी हे फलक जिल्हा प्रशासनाने लावले असावेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाला मराठी भाषेचा एवढा आदर असता तर, इंग्रजीमध्ये फलक लावण्याआधी त्यांनी ते मराठीतूनच केले असते, परंतु तसे झालेले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. जिल्हा प्रशासनानेच मराठीबाबत असा अनादर दाखवला तर जिल्ह्यातील अन्य आस्थापनांकडून काय अपेक्षा ठेवायच्या हा मोठा प्रश्न आहे.कार्यालयातील नामफलक बदललेजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या केबिनमध्ये तसेच कॉरिडॉरमध्ये १८८५ पासून आतापर्यंतच्या जिल्हाधिकारी यांची नावे, कार्यकाळ याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे हे फलक इंग्रजीमध्ये छापलेले आहेत. मराठी भाषा समिती येणार याची माहीत कळताच जिल्हाधिकारी कार्यालयाने रातोरात मराठीमध्ये फलक तयार करून घेतले. सोमवारी दुपारी हे सर्व फलक बसवण्यात आले आहेत.