लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर-प्रतापगड रस्ता आता खुला झाला आहे. आज रायगड जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांना भेटून त्यांना एक हजार 200 अन्नधान्य किटचे वाटप केले. तसेच आणखी 10 हजार तयार जेवणाचे पॅकेट्स प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावातील गावकऱ्यांसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्रतापगडाच्या पायथ्याशी 35 गावे आहेत. सुमारे दोन हजार कुटुंब आहेत. अतिवृष्टीमुळे प्रतापगड पायथा ते महाबळेश्वर रस्ता मागील 7-8 दिवसापासून बंद असल्यामुळे या गावकऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. मात्र रायगड जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन रस्ता मोकळा करण्याचे काम केले आणि संपर्क तुटलेल्या गावांशी पुन्हा संपर्क साधण्यात यश मिळविले.
या गावकऱ्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.दरम्यान, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी मदत पाेचवली.