तौत्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली SMS ब्लास्टर सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:48 PM2021-05-16T21:48:00+5:302021-05-16T21:54:40+5:30
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा तसेच सुरक्षा संबंधीच्या उपाययोजनांची वेळोवेळी माहिती पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने "मोबाईल एसएमएस ब्लास्टर सेवा" सुरू केली आहे.
रायगड : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा तसेच सुरक्षा संबंधीच्या उपाययोजनांची वेळोवेळी माहिती पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने "मोबाईल एसएमएस ब्लास्टर सेवा" सुरू केली आहे.
रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7 हजार 152 चौरस किलोमीटर आहे तर या जिल्ह्याला 240 चौरस किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. यापैकी एकूण 2 हजार 288 चौरस किलोमीटर परिसरातील नागरिकांना या "एसएमएस ब्लास्टर" सेवेमार्फत महत्त्वाचे संदेश पोहोचणार आहेत.
केंद्र शासनाच्या कार्मिक प्रशिक्षण विभागातर्फे (DOPT)" सावधान" हे वेबपोर्टल चालविले जाते. हे वेब पोर्टल कोविड-19 बाबतच्या माहितीच्या आदान-प्रदानासाठी तयार करण्यात आले आहे. केंद्र शासनाची विशेष परवानगी घेऊन या वेब पोर्टलच्या माध्यमातून "ताउक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड मधील जनतेला "मोबाईल एसएमएस" सेवेद्वारे सावधानतेचा इशारा तसेच सुरक्षेसंबंधीच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मागील वर्षी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही या वेबपोर्टल चा अशा प्रकारे उपयोग करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य सचिव डॉ.पद्मश्री बैनाडे, राज्य नियंत्रण कक्ष अधिकारी, मंत्रालय श्री.ओंकार नवलीहळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक हे या "मोबाईल एसएमएस ब्लास्टर" सेवेचे सनियंत्रण करीत आहेत.