रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; जिल्हाधिकारी जावळे यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

By निखिल म्हात्रे | Published: July 14, 2024 07:36 PM2024-07-14T19:36:58+5:302024-07-14T19:37:17+5:30

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला.

Raigad district administration on alert mode; Collector Javale reviewed the disaster management | रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; जिल्हाधिकारी जावळे यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; जिल्हाधिकारी जावळे यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील दरडप्रवण अन पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. अंबा व कुंडलिका नदीची पातळी इशारा स्तरापर्यंत आहे. या नद्यांजवळच्या गावातील प्रशासनाने घेतलेली खबरदारी, पर्यायी व्यवस्था, यंत्रणेची सुसज्जता याची माहिती घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पाऊस, संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी जावळे म्हणाले जिल्हा प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत शिबिरे म्हणून वापरता येतील, अशा इमारती प्रशासनाने ओळखल्या आहेत. तहसीलदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असतील याची खात्री करण्यास सांगितले आहे. आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्याची कार्यवाही तत्काळ करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही सांगितले.

विविध विभाग, तसेच तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामग्री सुस्थितीत आहे का याची तपासून खात्री करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पाटबंधारे, आरोग्य, महावितरण, बांधकाम विभाग, बंदर विभाग आदी महत्त्वाच्या विभागांना त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान खात्याने पुढील काही दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील काही दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या क्षेत्रातील सर्व धोकादायक स्थळांचा अभ्यास करून आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांसाठी कृती आराखडा तयार ठेवावा.

सर्व शासकीय विभागप्रमुखांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या सूचनेनुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून "अलर्ट मोड' वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिल्या.

 

Web Title: Raigad district administration on alert mode; Collector Javale reviewed the disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.