अलिबाग : राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वोत्तम बँक म्हणून ‘सहकार महर्षी’ हा पुरस्कार याआधीच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (आरडीसी) मिळाला आहे. आता देशातील सहकार क्षेत्रातील सर्वोत्तम बँक म्हणून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव १८ सप्टेंबर रोजी गोवा येथे होणाऱ्या कार्यक्र मामध्ये केला जाणार आहे. नॅफकब तथा बँकिंग फ्रंटीयर्स या देशातील नामवंत संस्थेकडून हा पुरस्कार दिला जाणार आहे. देशातील तब्बल २३० सहकारी बँकांमधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या वर्षी बँकेला बेस्ट ‘क्रेडिट ग्रोथ’ आणि ‘बेस्ट टेक्नॉलॉजी’ या विभागातील सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत.
गतवर्षी देखील महाराष्ट्र सरकारचा सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने दिला जाणारा सहकारमहर्षी, २०१२-१३ साली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकारनिष्ठ, २०१२-१३ साली सहकार भूषण पुरस्कार बँकेला प्राप्त झालेले आहेत. सहकारातील सर्व पुरस्कार प्राप्त करणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील एकमेव बँक ठरली होती. या पुरस्कारामध्ये आणि कामगिरीमध्ये अव्वल दर्जाचे सातत्य राखत बँकिंग फ्रंटीयर्सच्या वतीने सलग तिसऱ्यांदा बँकेला पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.राज्याच्या सहकार क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर देशपातळीवर देखील बँकेच्या कार्याची दखल घेतली जात आहे. बँकेची सर्वोत्तम आर्थिक स्थिती, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि प्रभावी नियोजन यामुळे बँकेच्या व्यवसायामध्ये सातत्याने वाढ होत आहे. तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवा यांचा मेळ उत्तमरीत्या सांभाळल्यामुळे आज बँक देशात अग्रेसर ठरत असल्याचे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
नॅफकब तथा बँकिंग फ्रंटीयर्स ही देशातील बँकांचे मूल्यमापन करून बँकांनी केलेल्या वर्षभरातील कामकाज तसेच बँकेमधील गुणवत्ता, आर्थिक स्थिती याच्या आधारे बँकांना पुरस्कार देत असते. रिझर्व बँकेचे माजी अधिकारी, बँकिंगमधील तज्ज्ञ यांच्या वतीने देशातील सरकारी, खाजगी तसेच सहकारी बँकांचे परीक्षण करून त्यांच्या कामकाजाच्या आधारे पुरस्कार दिले जातात. यावर्षी बँकिंग फ्रंटीयर्स या संस्थेने देशातील तब्बल ३२० पेक्षा अधिक सहकारी बँकांचे वार्षिक कामकाज, गुणवत्तापूर्ण सेवा यांचा अभ्यास करून रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवड या पुरस्कारासाठी केली आहे.