- जयंत धुळपअलिबाग - रायगड जिल्ह्याला आपत्ती प्रसंगी मदत व बचावासाठी स्वत:चा निधी असावा, या जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडलेल्या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर)मधून तब्बल १५ लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात संकलित झाला आहे. परिणामी स्वत:चा आपत्ती प्रतिसाद निधी उभारणारा रायगड जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे.जिल्ह्यात पूर, दरड कोसळणे, तसेच समुद्रकिनारा लगत असल्याने चक्रिवादळ, त्सुनामी, सागरी उधाणे आदी नैसर्गिक आपत्ती व विविध मानवनिर्मित आपत्तींच्या घटनांचा धोका अनेकदा संभवत असतो.अशा वेळी जिल्ह्यातील आपत्ती प्रवणता विचारात घेऊन सक्षम प्रतिसाद आणि धोके सौम्यीकरणासाठी जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी निर्माण करण्याचा निर्णय रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला. जिल्ह्यातील विविध उद्योग व प्रतिष्ठानांनी या महत्त्वपूर्ण निधीस आर्थिक साहाय्याचा प्रतिसादही देऊ केला आहे. ७ फेब्रुवारीला याद्वारे १५ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे संकलित झाला आहे. गुरुवारी या निधीसाठी दीपक फर्टिलायझर्सशी संलग्न ईशान फाउंडेशन या संस्थेने पाच लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. तसेच एल.जी.पी.एल. लि. व गॅलॅक्सी प्रा.लि. तळोजा या उद्योगांनीदेखील प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, दीपक फर्टिलायझर्सचे उप महाव्यवस्थापक संतराम चलावाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक हे उपस्थित होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सह संचालक एम. आर. पाटील यांची हा निधी प्राप्त करण्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आपत्ती प्रतिसाद निधी उभारणारा रायगड जिल्हा राज्यात पहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 6:04 AM