अलिबाग : रायगड जिल्ह्यात लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. १ ते २५ एप्रिल या कालावधीपर्यंत १ ते १८ वयोगटातील १ हजार ६०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ८३६ वर पोहोचली आहे, तर दोन हजार ८८ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पनवेल, खालापूर, कर्जत, अलिबाग, पेण, माणगाव आणि महाड तालुक्यांत होणारी रुग्णवाढ चिंताजनक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी करोनाबाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुले आणि तरुणांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे.
जिल्ह्यात १ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत १ ते १८ वयोगटातील एक हजार ६० हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आयसीएमआरच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांना फारसा त्रास जाणवला नव्हता. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये नगण्य होते. मात्र, यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. लहानांमध्येही कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण मोठे आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्यात कोरोनाची सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणेही आढळून येत आहेत. ही एक चिंताजनक बाब आहे. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
वयस्कर कोरोनाबाधितांसाठी आता उपचार पद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ठराविक औषधांचा वापर केला जात आहे. मात्र, लहान मुलांच्या बाबतीत अशी उपचार पद्धती आखून देण्यात आलेली नाही. त्यांना लक्षणांवर आधारित औषधे दिली जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रोग प्रतिकारशक्ती लहान मुलांमध्ये चांगली असल्याने ही मुले कोरोनातून सहज बरे होत असल्याचे बालरोगतज्ज्ञ सांगतात.
सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी यासारखी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येत आहेत, तर काही मुलांमध्ये कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. अशी मुले कोरोनाचे सुपर स्प्रेडर म्हणून काम करू शकतात, त्यामुळे अशा मुलांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना घरीच सुरक्षित आणि विलगीकरणात ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. बरेचदा लहान मुलांची कोविड टेस्ट करण्यास पालक फारसे इच्छुक नसतात. मात्र, ही बाब घरातील इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे दिसत असतील, डॉक्टरांनी कोविड चाचणी करण्याचे निर्देश दिले असतील, तर ही चाचणी लवकर करून घेणे आणि औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे.