रायगड जिल्ह्यात जत्रोत्सवांवर पसरले कोरोना विषाणूचे सावट, दरवर्षी होणारी लाखोंची उलाढाल ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 02:30 AM2020-12-07T02:30:49+5:302020-12-07T02:31:23+5:30
Raigad News : गावागावांतून यात्रा रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे आता गावागावांतील छोट्या विक्रेत्यांचे अर्थकारणच ठप्प झाले आहे.
- निखिल म्हात्रे
अलिबाग : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले. त्यानंतर, आता गावागावांतून यात्रा रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे आता गावागावांतील छोट्या विक्रेत्यांचे अर्थकारणच ठप्प झाले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या जत्रोत्सव रद्द करण्याच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
दिवाळी संपली की, कोकणातील जत्रोत्सव सुरू होतात. रायगड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला असला, तरी यंदा त्यावर कोरोनाचे सावट पाहायला मिळते आहे. यामुळे अशा उत्सवातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. दरवर्षी होणारी गर्दी यंदा पाहायला मिळाली नाही. जत्रोत्सवातून उपलब्ध होणारा रोजगार कोरोनामुळे बुडाला आहे.
हे दिवस शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस असतात. भातांची मळणी काढून झालेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे खुळखुळतात. त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यातून व्यावसायिकांना मोठा रोजगार उपलब्ध होत असतो. ऐन यात्रांच्या हंगामातच कोरोनाने विळखा घट्ट केला आहे. अनेक ठिकाणी धार्मिक, भावनिक प्रश्न असल्याने गावागावांत स्थानिकांच्या बैठका सुरू होत्या. बहुतांशी ठिकाणी फक्त धार्मिक व रितीनुसार आवश्यक तितकेच विधी थोडक्यात करण्याविषयी एकमत झाले.
अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वर, मापगाव येथील कनकेश्वर आणि वरसोली येथील आंग्रेकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, तसेच चौल येथील दत्त मंदिराची जत्रा, पेणची जत्रा खालापूर तालुक्यातील साजगावची बोंबले विठोबाची जत्रा भाविकांचे मोठे आकर्षण असते, जत्रा म्हणजे बच्चे कंपनीसाठी मोठी पर्वणीच असते. अनलॉकच्या प्रक्रियेत मंदिरे उघडलेली असतानाच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे सुनेसुने वातावरण दिसते आहे.
सोशल मीडियावरून देतात माहिती
यात्रांचे नियोजन अगोदरच ठरले असल्याने, अनेक जण जत्रोत्सवासाठी गावी परततात. लांबच्या शहरातूनही गावाकडे यात्रेसाठी येणारे भाविक असतात. यात्रा रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावरून याची कल्पना ग्रामस्थांमार्फत देण्यात येत आहे. विविध ग्रुपच्या माध्यमातून ही माहिती बाहेरगावातील भाविकांना असल्याने त्यांचे येणेही आता रद्द झाले आहे.