लाच प्रकरणांत रायगड जिल्हा आघाडीवर
By admin | Published: November 28, 2015 01:16 AM2015-11-28T01:16:55+5:302015-11-28T01:16:55+5:30
लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे
बोर्ली-मांडला : लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे, असे असले तरी उपलब्ध आकडेवारीवरून जिल्ह्यात लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत.
जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे वर्षाला सरासरी दहाच्या आसपास उघडकीस येत असत. मात्र २०१४ ते नोव्हें. २०१५ पर्यंत ४९ लाचखोरीची प्रकरणे उघड झाली असून, यात ६८ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या दोन वर्षांत प्रत्येकी तीन व चार असे सात गुन्हे साबीत झाले आहेत. रायगड लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुरकर आणि त्यांच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्तादेखील उघडकीस आली आहे.
एका बाजूला भ्रष्टाचाराने नडलेली सामान्य जनता आणि दुसऱ्या बाजूला ऐशोआरामात राहणारी नोकरशाही असे दिसत आहे. लाचलुचपत विभागाने भ्रष्ट नोकरशाहीवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीद्वारे होणाऱ्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याच्या प्रयत्नात असून, यास जनतेने सहकार्य करावे, असेही आवाहन वेळोवेळी लाचलुचपत विभागाकडून केले जात आहे.
लोकप्रतिनिधीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेण्यास अनेक अडचणींबरोबर सामना करावा लागतो. मात्र जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती उत्तम कोळंबे आणि खालापूर पंचायत समिती सदस्य निवृत्ती खंडू पिंगळे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेत पोलीस कोठडीत ठेवण्याचे धाडस दाखविले होते. याचबरोबर जवळपास अकरा अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचारात महिलाही कमी नाहीत हे नगररचना विभागाच्या सहा. संचालक दिशा सांवत, सहकार विभागाच्या राखी गावडे दामत, तलाठी मनीषा हुलवले या सारख्या महिला अधिकारी - कर्मचारी यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी निगडीत महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर १४ कारवाई, तर जनतेचे ेसंरक्षण करणारा विभाग म्हणजे पोलीस विभागातील सात पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.