रायगड : जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्ण संख्येचा विस्फाेट झाला आहे. गेल्या सात दिवसात एक हजार ८६३ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याने हा काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. सरकार, प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा काेराेनाचा उद्रेक अटळ असल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काेराेनाचा संसर्ग थांबला हाेता. मात्र आता काेराेनाने चांगलीच उसळी मारल्याचे आकडेवारीवरुन समाेर आले आहे. अनलाॅकनंतर सर्वच व्यवहारांना सरकारने ढील दिल्याने आणि नागरिकांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. १६ मार्च ते २२ मार्च २०२१ या कालावधीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास काेराेनाचा विस्फाेट झाल्याचे दिसते. या सात दिवसांमध्ये तब्बल एक हजार ८६३ रुग्ण सापडल्याने सरकार आणि प्रशासन चांगलेच चक्रावून गेले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये काेराेनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याचे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्या खालाेखाल पनवेल ग्रामीण आणि त्यानंतर उर्वरित रायगडचा क्रमांक लागताे. मायानगरी मुंबई आणि नवी मुंबईला अगदी खेटून पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर तालुके आहेत. तसेच अलिबाग आणि पेण तालुक्यातून कामानिमित्त माेठ्या संख्येने नागरिक मुंबईमध्ये जात असल्याने या ठिकाणची रुग्ण संख्याा वाढताना दिसत आहे. २२ मार्च राेजी एका दिवसात विक्रमी अशी ४०० रुग्णांची नाेंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतची रुग्ण संख्या ६८ हजार ४०६ वर पाेहोचली आहे. तर ६४ हजार ६४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समाेर आले आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने निर्बंध कडक केले असले, तरी त्यांची याेग्य प्रकारे अंमलबजावणी हाेत नसल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासन, आराेग्य विभाग, पाेलीस प्रशासनाने तातडीने याबाबत पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा काेराेनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.