रायगड जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटना देशात सर्वोत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 01:25 PM2018-01-05T13:25:29+5:302018-01-05T13:25:57+5:30
रायगड जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या व राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने नियोजित केलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमांना देशात अव्वल मानांकन मिळून या वर्षीचा सर्वोत्तम शाखेचा पुरस्कार मिळाला आहे.
जयंत धुळप/ रायगड - रायगड जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या व राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेने नियोजित केलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमांना देशात अव्वल मानांकन मिळून या वर्षीचा सर्वोत्तम शाखेचा पुरस्कार मिळाला आहे. ४ जानेवारीला नागपूर येथील ५५व्या अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ परिषदेत हा पुरस्कार प्रदान कारण्यात आला. हा कार्यक्रम रेशीमबाग, नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पाडला. ह्या कार्यक्रमास देशाचे भूपृष्ठ वहातुक व जहाज मंत्री नितीनजी गडकरी , महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे उपस्थित होते.
या पुरस्काराच्या वितरण सोहळ्यासाठी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटणकर यांच्यासोबत सचिव डॉ प्रमोद वानखेडे(खोपोली) व खजिनदार डॉ विनायक पाटील(अलिबाग) यांना विशेष आमंत्रित केले होते. हा पुरस्कार जाहीर झाल्याने संघटनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व बालरोगतज्ज्ञांनी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
जलसंजीवनी सप्ताह, स्तनपान सप्ताह, प्रतिजैवके जनजागृती सप्ताह, लहान बालके व किशोरवयीन मुलांच्या आरोग्याची काळजी सप्ताह इत्यादी कार्यक्रम संपूर्ण रायगडभर राबण्यात आले.
या व्यतिरिक्त जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांसाठी लहान मुलांच्या आकडी व मेंदूविकार समस्या, स्टीमुलेशनवर आधारित अतिगंभीर रुग्णावर अत्यावश्यक सेवा तसेच सर्वसाधारण रोजच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची तपासणी व उपचार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्याने व चर्चासत्रे देखील आयोजित करण्यात आली होती. डॉ महेश मोहिते(पनवेल) यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या स्तनपान सप्ताहमध्ये १-७ ऑगस्टदरम्यान जवळपास १००हून अधिक कार्यक्रम राबवले गेले. गरोदर माता, महिला, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, रुग्णसेविका, परिचारिका, वैद्यकीय व्यावसायिक इत्यादींनसाठी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. डॉ शिल्पा कलाने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने परिसेविकांसाठी स्तनपान विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे ८० परिचारिकांनी भाग घेतला होता. यासारख्या अनेक कार्यक्रमांची दखल घेऊन राष्ट्रीय बालरोगतज्ञ संघटनेने राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक देऊन गौरविले आहे.
प्रतिजैवकांचा अनावश्यक वापर व त्यामुळे होणाऱ्या समस्या याविषयी राष्ट्रीय संघटनेच्या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात प्रतिजैवके जनजागृती आठवडा डॉ राजेंद्र चांदोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली २८सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आला. जिल्ह्यातील डॉक्टर, औषध विक्रेते, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी, रुग्णासहाय्यक व रुग्णसेविका, परिचारिकांसाठी विशेष मार्गदर्शनपर जवळपास ८० व्याख्याने व शिबिरे आयोजित कारण्ययात आली होती. या कार्यक्रमाची नोंद घेत राष्ट्रीय संघटनेने राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक जाहीर केले आहे.
किशोरवयीन मुलांमध्ये उदासिनता, अनावश्यक आक्रमकता, व्यसनाधीनता, लैंगिक अत्याचार, आत्महत्या या सारख्या वाढत्या सम्यसा लक्षात घेऊन या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३-१९नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात आलेल्या बाल व किशोरवयीन मुलांचे आरोग्य आठवड्यात ८०हुन अधिक कार्यक्रमांचा आढावा घेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक पटकावण्याचा मान मिळाला आहे. या आठवड्यात या व्यतिरिक्त किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीच्या सम्यस्या, ५ वर्ष्याखालील मुलांची विविध शाळांमध्ये जाऊन आरोग्य तपासणी व सुदृढ बालक स्पर्धा, रांगोळी व पोस्टर स्पर्धाचे देखील आयोजन केले होते.
डॉ आबासाहेब पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली २३ ते २७ जुलै दरम्यान राबवण्यात आलेल्या जलसंजीवनी साप्ताहात २००हुन अधिक कार्यक्रमांची दखल घेऊन तृतीय पारितोषिक देण्यात आले. नुकत्याच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञ परिषदेमध्येदेखील रायगड शाखेला स्तनपान सप्ताह व जलसंजीवानी सप्ताहाला प्रथम पारितोषिकाने गौरविले आहे. या सर्व कार्यक्रमांच्या संकल्पनांची जबाबदारी डॉ हेमंत गंगोलिया(नेरळ) व डॉ.चंद्रशेखर दाभाडकर(महाड) यांनी मोठ्या कल्पकतेने पार पाडली.
हे कार्यक्रम यशस्वीपणे राबण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या बालरोगतज्ज्ञ शाखेच्या कार्यकारणी मंडळासोबत इतर सर्व बालरोगज्ञ, डॉक्टर्स, परिचारिका, केमिस्ट, पॅथॉलॉजी, फार्मा कंपनी, स्थानिक शिक्षण संस्था, महाविद्यालये, एम जी एम वैद्यकीय महाविद्यालय, हितचिंतक आणि मित्रमंडळींनि सर्वोतोपरी मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार डॉ पाटणकर यांनी मानले आणि असेच सहकार्य करण्याची विनंती केली.
ह्या कार्यक्रमाला डॉ पाटणकर यांच्या सोबत रायगड जिल्ह्यातील डॉ प्रमोद वानखेडे, डॉ विनायक पाटील, डॉ महेश मोहिते, डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, डॉ हेमंत गंगोलिया, डॉ सुनील शेट, डॉ शशांक महाजन, डॉ प्रसंना बनसोडे, डॉ सौ. संगीता वानखेडे उपस्थित होते.