‘निसर्ग’च्या फटक्यानंतर सावरतोय रायगड जिल्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:02 AM2020-06-05T00:02:13+5:302020-06-05T00:02:31+5:30
प्रशासनाचे काम सुरू : वादळामुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमध्ये नुकसान
निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरूड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यांना बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक भागांत झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. अनेक इमारतींचे पत्रेही उडाले आहेत. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
पोलादपूर वीज महावितरणकडून कामाला सुरुवात
पोलादपूर : बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यात विद्युत पोल कोसळून, तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर वीज महावितरण कंपनीकडून कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली असून वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. यासाठी अजय सलगर आणि टीम मेहनत घेत आहे.
पोलादपूर शहर परिसरातील एल टी लहान लाइन १४ खांब तर एच टी मेन लाइन पोलादपूर पेट्रोल पंप येथील एक खांब आणि राजेवाडी भागातील पाच खांबांचे नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणने कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली असून राजेवाडी भागातील पोल उभे करण्यात आले आहेत. पेट्रोल पंपावरील खांबांच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. पोलादपूर शहर परिसरातील विद्युत खांब दुरुस्तीनंतर सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे सांगण्यात आले
आहे.
दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा सुरळीत कण्यासाठी सर्व विभागांत कर्मचारी काम करीत आहेत. ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ही कामेही लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
नुकसानग्रस्तांना तत्काळ
मदत करावी - प्रवीण दरेकर
च्अलिबाग : निसर्ग वादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणासाठी विशेष पॅके ज जाहीर करीत तत्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अलिबाग येथे केली आहे. तसेच जिल्ह्यात झालेल्या दोन मृत्यूची माहिती घेऊन अलिबाग तालुक्यातील रामराज-उमठे येथील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली.
च्श्रीवर्धन, मुरुडसह अलिबागला निसर्ग वादळाचा चांगलाच तडाखा बसला. जिल्हाभरात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अलिबागेत आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकऱ्यांकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेऊन नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
चक्रीवादळात भिंत कोसळून महिला ठार
माणगाव : गोरेगाव शहरनजीक देवळी गावात एका घराची भिंत वादळात पडल्याने घरातील एक महिला जागीच ठार झाली तर दोघे जखमी झाल्याची घटना ३ जून रोजी दुपारी १ वाजता घडली. ललिता नथुराम सत्वे (४५, रा. उणेगाव) या माहेरी देवळी येथे आल्या आसता घराची भिंत कोसळून डोक्यात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे भाऊ राजेंद्र भगोजी कालेकर (३५, रा. देवळी), भावजय विक्रांती विक्रम कालेकर (२५) हे दोघे जखमी झाले.
माणगाव तालुक्यात निसर्गचे थैमान
माणगाव : तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई-गोवा महामार्गावर, राज्यमार्गावर व विविध अंतर्गत ठिकाणी झाडे पडली होती. आपत्कालीन यंत्रणेने ही झाडे ताबडतोब दूर केली. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथे सिलिंडर असलेल्या ट्रेलरला आग लागली. प्रशासनाने अग्निशामक दलास बोलावून ही आग विझविण्यास मदत केली. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.