रायगड जिल्ह्यात आनंदाने झाला श्रीगणेशा, विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा
By निखिल म्हात्रे | Published: September 1, 2022 12:47 PM2022-09-01T12:47:13+5:302022-09-01T12:51:38+5:30
जिल्ह्यात गणेशोत्सवाला बुधवारपासून धुमधडाक्यात व भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.
अलिबाग -
जिल्ह्यात गणेशोत्सवाला बुधवारपासून धुमधडाक्यात व भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील घरोघरी विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा करून आपल्या आराध्य दैवत असणा-या गणेश बाप्पाच्या सेवेत रममाण झाले आहे. त्यामुळे ग्रामिण भागासह शहरीभागात ही नवचैतन्य निर्माण झाले असून बाप्पाच्या समोरील भजन, किर्तन व धावरे नाचाने रात्री जागू लागल्या आहेत.
माहाराष्ट्रात साज-या होणा-या सणांपैकी कोकणात सर्वात मोठ्या प्रमाणात व उत्साहात साजरा होणारा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहीले जाते. हा सण म्हणजे कोकणकरांसाठी जणू आनंदच आसतो. यानिमित्ताने घराघरात दिड, पाच, सात, नऊ, आकरा, सतरा व एकविस दिवसाचे गणराय विराजमान झाले असून सर्वजण आपापसातील मतभेद, दु:ख, चिंता बाजूला सारून गणेशाच्या भक्तीते तल्लीन झाले आहेत.गणेशोत्सवाच्या निमित्ताने नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी गावागावात दाखल झाले असून घरातील सदस्य यानिमित्ताने एकत्र आले आहेत.
एकूण आपल्या लाडक्या बाप्पाच्या पुजनासाठी बुधवारी सकाळपासूनच लगबग दिसून आली होती. जिल्ह्यात प्रत्येक गावागावात आपापल्या रुढी परंपरेनुसार गणरायाचे पुजन झाले. आजही ग्रामिण भागात पुरोहीतांकडून पुजापाठ करून विधीवत पुजन करण्याची प्रथा आहे. तर काही ठिकाणी पुरोहीता अभावी घरातील जेष्ठांकडून बाप्पाचे पुजन होते. जिल्ह्यात गणपती पुजनानंतर विविध कार्यक्रम हि पार पाडण्यात आले होते.
जिल्ह्यात गणपती बाप्पाचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन हि सज्ज झाले आहे. तसेच कोकणात येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना रायगड पोलिसांकडून मास्क, पाणी बाॅटल व बिस्कीट दिले जात आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या या नव्या संपल्पनेचे गणेश भक्तांकडून स्वागतच होत आहे.