अलिबाग : गेल्या चार दिवसांपासून सातत्याने जिल्ह्यात पावसाचा कहर थांबलेला नाही. त्यामुळे सर्वत्रच पाणीच पाणी झाले आहे. सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रविवारी देखील पावसाचा जोर कायम होता. सततच्या पावसामुळे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कुंडलिका नदी आणि अंंबा नदी धोका पातळीच्या फक्त दीड मीटरने खाली वाहत होती. पावसाचा कहर असाच सुरू राहिल्यास रात्रीपर्यंत या नद्या धोक्याची पातळी गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे.२७ जूनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी गेल्या चार दिवसांत तब्बल ६०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ७ जून ते ३० जून २०१८ या २३ दिवसांच्या कालावधीत ९११ मिमी पाऊस झाला होता. याची तुलना केल्यास यावर्षी ६७ टक्के पाऊस हा फक्त तीनच दिवसात पडला आहे. पावसाने मुसळधार बरसत आपला कोटा पूर्ण केला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बँकांना सुट्टी असल्याने सर्वांनी घरात राहूनच पावसाची मजा घेतली. त्याचप्रमाणे क्रिकेट वर्ल्ड कपचा सामना बघणेच नागरिकांनी पसंत केले. त्यामुळे अलिबागच्या प्रमुख रस्त्यांवर चांगलाच शुकशुकाट असल्याचे दिसून आले.महामार्गावर वाहतूक संथ गतीनेरविवारी देखील पावसाच्या धारा सुरूच होत्या. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पेण, वडखळ, नागोठणे, लोणेरे, माणगाव आणि महाड येथील वाहतूक संथगतीने सुरू होती. त्याचप्रमाणे येथील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरून अपघातांची शक्यता असल्याने या ठिकाणाहून वाहने सावकाश चालवावीत, असे आवाहन जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमुख सुरेश वराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.मार्केटची भिंत कोसळलीनागोठणे : सलग दोन तीन दिवस पडणाऱ्या पावसाने शनिवारी सायंकाळी येथील चिकन - मटण बाजाराच्या मुख्य इमारतीची भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या दुर्घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून येथे व्यवसाय करणाºया १९ विक्रेत्यांना इमारत खाली करण्याची नोटीस बजावली आहे. याबाबत सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना विचारले असता, इमारत धोकादायक असल्याने सर्व विक्रेत्यांना जागा खाली करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासंदर्भात रोहे पंचायत समितीकडे पत्र सुध्दा पाठवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रेवदंड्यात खड्ड्यांचे साम्राज्यरेवदंडा : मान्सून पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रेवदंडा अलिबाग हमरस्त्यावरील गोळा स्टॉप ते आगरकोट किल्ल्यातील सातखणी मार्गाकडे जाण्यापर्यंतचा रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय बनला असून वाट अत्यंत बिकट झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखाद्या रुग्णाला घेऊन जायचे झाले तरी वाहनचालक हैराण होत आहेत. छोटी वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येत असलेल्या या रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरावेत अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
रायगड जिल्ह्यात संततधार सुरूच; कुंडलिका, अंबा, गाढी नदीने गाठली धोक्याची पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 5:22 AM