- निखिल म्हात्रे अलिबाग - अलिबाग-पेण मार्गावरील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलसमोर नियमीत वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांसह विद्यार्थ्यांना कायमच बसत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्कूलमधील विद्यार्थीनीने पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट घेऊन वाहतूक कोंडीवर उपाय योजना करण्याची मागणी केली होती. तिच्या या मागणीची दखल घेत शाळेसमोर वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.
अलिबाग-पेण मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. लहान मोठ्या वाहनांची ये-जा सुरुच असते. या मार्गावरील चेंढरे येथे रस्त्यालगत सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल आहे. सकाळ संध्याकाळी शाळा भरताना आणि सुटताना शाळेसमोर वाहनांची प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. वाहतुक कोंडीवरील प्रश्न सोडविण्यासाठी सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूलमधील विद्यार्थीनी प्राप्ती दर्शन म्हात्रे हीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी शाळेसमोर एक वाहतूक पोलीस शाळेच्या वेळेनुसार मिळावे, अशी मागणी तिच्याकडून करण्यात आली होती.
प्राप्ती म्हात्रे या विद्यार्थिनीच्या मागणीची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कार्यवाही सुरु केली असून जिल्हा वाहतूक शाखेतील सहाय्य पोलीस उपनिरीक्षक प्रकाश काळोखे आणि पोलीस हवालदार सचिन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे शाळेसमोर वाहतूक पोलीस असल्याने बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या चालकांना शिस्त लागली असून वाहतूकदेखील सुरळीत होत आहे. त्यामुळे प्राप्तीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंसह अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व संपुर्ण रायगडपोलिसांचे आभार मानले आहेत.