- जयंत धुळप, अलिबागजिल्ह्यात नगरपालिका, रायगड जिल्हा परिषद व १५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमुळे मोठ्या कालावधी करिता निवडणूक आचारसंहिता लागू होती. परिणामी, नवीन विकासकामे सुरू करण्यात अडचण येत होत्या; परंतु जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय यांनी सरकारकडून आलेल्या निधीचा योग्य वापर करून विकासकामे करण्याकरिता निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नियोजन केले होते. त्यानुसार नियोजित कालावधीत विकासकामांकरिता निधी खर्च करण्यात रायगड जिल्ह्याने संपूर्ण कोकणात प्रथम क्रमांक पटकावला आहे.कोकण महसूल विभागात निधी खर्च करण्यात रायगड प्रथम क्र मांकावर असून आतापर्यंत ६४ टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधीचे वाटप येत्या १० दिवसांत करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन विभागांतर्गत येणारा सर्व निधी यावर्षी खर्ची पडणार असून कोणत्याही विभागाचा निधी परत जाणार नसल्याचे विश्वास जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी व्यक्त केला आहे.रायगड जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन जिल्हा समितीमार्फत करून मोठ्या प्रमाणात विकास निधी वेगवेगळ्या विभागांना पुरविला जातो. रायगड जिल्ह्याची २०१६-१७ या आर्थिक वर्षाची तरतूद १६० कोटी रुपये आहे. यापैकी १५१ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत त्यापैकी १०४ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्ष पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्हा नियोजन समितीअंतर्गत एकूण ३५ विभागांना निधीचा पुरवठा केला जातो. त्यापैकी पशुसंवर्धन विभागाला ३ कोटी ७४ लाख रुपये, रस्त्यासाठी १८ कोटी, तर साकवांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद आहे. मत्स्य विभागाकरिता ४ कोटी ५५ लाख रुपये, वनविभागाकरिता १३ कोटी रुपये, जिल्हा उद्योग केंद्राकरिता ५४ लाख रुपये, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकरिता १ कोटी २० लाख रुपये, तर जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत नागरी सुविधांसाठी ७ कोटी रुपये, रायगड जिल्हा रुग्णालयाकरिता ७ कोटी रुपये, क्र ीडा विभाग १ कोटी ५४ लाख रुपये, तर अंगणवाडीसाठी ३ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नगरविकास विभागासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले. वाटप झालेल्या १५१ कोटी रुपयांच्या निधी पैकी १०४ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. रत्नागिरीमध्ये ७५ कोटी, सिंधुदुर्गात ७१ कोटी, तर रायगडमध्ये १५१ कोटी खर्च कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्याची वार्षिक निधी तरतूद १५८ कोटी रुपये असून आतापर्यंत ४८ टक्के म्हणजे ७५ कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची वार्षिक निधी तरतूद १३० असून आतापर्यंत ५५ टक्के म्हणजे ७१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रायगड मध्ये १५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण विभागात जिल्हा नियोजनाचा निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा प्रथम ठरला आहे. त्यावर्षीचा विकास निधी त्याच नियोजित वर्षात खर्च करणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले सातत्याने सर्व विभागाचा वारंवार आढावा घेत आहेत. गेल्या वर्षी रायगडचा ९ कोटी रुपयांचा निधी वापरला गेला नव्हता. परिणामी, तो आर्थिक वर्षअखेरीस शासनास समर्पित करावा लागला होता. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याकरिता दक्षता घेतली जात असल्याचे जाधव यांनी अखेरीस सांगितले.
निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा अव्वल
By admin | Published: March 19, 2017 5:37 AM