रायगड जिल्हा पर्यटकांनी हाउसफुल्ल, समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:16 AM2018-12-31T00:16:50+5:302018-12-31T00:17:06+5:30
नववर्षाचे सेलिब्रेशन एखाद्या हॉट डेस्टिनेशवर करण्याचा ट्रेड सध्या पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
अलिबाग : नववर्षाचे सेलिब्रेशन एखाद्या हॉट डेस्टिनेशवर करण्याचा ट्रेड सध्या पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
मौज-मस्ती आणि सोबतीला साग्रसंगीताची मजा अनुभवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांना अधिकची पसंती दिली जात आहे, त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणारी शहरे आणि गावे पर्यटकांच्या गर्दीमध्ये चांगलीच नाहून निघाली आहेत. येथील विविध हॉटेल्स, रेस्टारंट, रिसार्ट आणि कॉटेजेस हाउसफुल्ल झाली आहेत. सोमवारी साजरा केल्या जाणाºया सेलिब्रेशनसाठी शनिवार आणि रविवारीच पर्यटक दाखल झाल्याने न्यू इयर पार्ट्यांना चांगलीच रंगत येणार असल्याचे दिसून येते.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, माथेरान अशा विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी केली आहे.
नागरिकांना आवाहन
प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या मध्यरात्री ठाणे-बेलापूर रोड, सायन- पनवेल महामार्ग, पामबीच रोडवर चक्काजाम होत असते. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रमुख रोडवर बंदोबस्त वाढविला आहे. मद्यपान करून वाहने चालविणाºयांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हॉटेल्स, पबमध्ये साध्या वेशातील पोलीसही पाळत ठेवणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाºयांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मद्यपानाऐवजी सहकुटुंब नवीन वर्षाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नववर्षाच्या स्वागतास फार्महाउसही सज्ज
पेण : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पेणमधील तरु णाई सज्ज झाली असून, या तरुणाईकडून पार्ट्यांचे नियोजन, आवडीची ठिकाणे याचबरोबर पेण शहराच्या आसपासच्या परिसरातील फार्महाउसची निवड केली जात आहे. २०१८ सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नववर्ष २०१९ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी फार्महाउस, हॉटेल, रिसार्ट या ठिकाणी सोमवारी सांयकाळपासून रात्रभर थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनच्या रंगतदार पार्ट्यांना उधाण येणार आहे.
मुंबई, पुणे तसेच राज्यातून येणाºया पर्यटकांच्या वाहनांची संख्या पाहता मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. जिते ते वडखळ, वडखळ ते अलिबाग, इंदापूर, माणगाव ही वाहतूककोंडीची ठिकाणे आहेत, त्यामुळे या ठिकाणांसह शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाºयांवर पोलिसांची चांगलीच नजर राहणार आहे.
अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाºयांवर सध्या पर्यटकांनी फुलला आहे. त्याच्या दिमतीला पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कुबा ड्रायव्हिंग, जेटस्की, स्पीड बोट, घोडे-उंट याची सफर अशा विविध मनोरंजनाची साधने तैनात करण्यात आली आहेत.
समुद्रकिनारी समुद्र सफरीचा आनंद लुटणाºया पर्यटकांसाठी सक्तीने लाइफ जॅकेट संबंधित व्यावसायिकाने पुरवणे जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले आहे, त्यामुळे लाइफ जॅकेट घातल्याशिवाय पर्यटकांना बोटीतून फिरता येणार नाही. प्रशासनाने याबाबत मेरीटाइम बोर्डाला तसे सक्त आदेश दिले आहेत, त्यामुळे अपघात झाल्यास पर्यटकांचे प्राण वाचणार आहेत. संबंधित बोट व्यावसायिक सूचनांचे पालन करतात की नाही, याची पाहणी करण्याची जबाबदारीही बंदर प्रभारींवर निश्चित केली आहे.
समुद्रकिनारी असणाºया कॉटेजमध्येही पर्यटकांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ, आॅर्केस्टा यांची व्यवस्था केली आहे. खवय्यांसाठी कोकणी, गोमंतक, आगरी, कोळी अशा पदार्थांची मेजवानी राहणार.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टारंटच्या व्यवस्थापनाने डिजे नाइट पार्टीचे आयोजन केले आहे. यासाठी विविध पॅकेजच त्यांनी पर्यटकांना देऊ केली आहेत. त्यामध्ये खाणे-पिणे, नाचगाणी यांचा समावेश आहे. उत्पादन शुल्क विभागाने काही रेस्टारंट यांना तात्पुरत्या स्वरूपात परवाने दिले आहेत. बनावट मद्य विक्री करणाºयांवरही नजर ठेवली आहे.