रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 01:38 AM2020-07-06T01:38:48+5:302020-07-06T01:39:13+5:30

पावसाने रविवारीही खोपोली, खालापूर, महाड, अलिबाग, पेण, उरण, नागोठणे परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यातच, सकाळच्या सुमारास पावसात कोसळलेल्या झाडामुळे विजेच्या ताराही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

Raigad district was lashed by rains | रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

Next

अलिबाग : तब्बल २५ दिवस उशिराने सुरू झालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले असून, सरासरी ८०.६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात रायगडमध्ये सुमारे १४९.८४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सध्या तर भातशेती लावण्यासाठी पुरेसा पाऊस झाला असला, तरी शनिवारी सकाळपासूनच जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी आता तिहेरी संकटात अडकला आहे. 

जूनच्या पहिल्या आठवडा अखेरपर्यंत पावसाला सुरुवात होते, परंतु यंदा निसर्ग चक्रीवादळानंतर २५ दिवस उशिराने पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने श्रीवर्धन येथे सर्वाधिक २३४ मिमी नोंद झाली आहे. त्या खालोखाल म्हसळा २१५ मिमी, तर सर्वात कमी महाड ६६ मिमी पावसाची नोंद करण्यात झाली आहे.

पावसाने रविवारीही खोपोली, खालापूर, महाड, अलिबाग, पेण, उरण, नागोठणे परिसरात जोरदार हजेरी लावली होती. त्यातच, सकाळच्या सुमारास पावसात कोसळलेल्या झाडामुळे विजेच्या ताराही उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, काही काळाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, झालेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि आंबा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली.

नवी मुंबईत चोवीस तासांत २३० मिमी
नवी मुंबई : शुक्रवारपासून पावसाचे जोरदार अगमन झाले. सलग तिसºया दिवशी रविवारी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे हा पाऊस लॉकडाऊनच्या पथ्यावर पडला. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडून लॉकडाऊनचे नियम मोडणाºयांना चाप बसल्याचे दिसून आले.
नवी मुंबईत गेल्या २४ तासांत सरासरी २३० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तर रविवारी वृक्ष कोसळण्याच्या सात घटना घडल्या आहेत. शहरातील काही सखल भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या, परंतु महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने तातडीने कार्यवाही करीत पाण्याला प्रवाह करून दिला. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईत शनिवारपासून लॉकडाऊन घोषित के ला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. भाजीपाला, दूध, औषधे व किराणा विक्रीच्या दुकानांनाही मर्यादित वेळ देण्यात आली आहे, पावसामुळे नागरिकांना निर्धारित वेळेत खरेदीसाठी बाहेर पडता आले नाही.

रोहा तालुक्यात मुसळधार
धाटाव : गेली अनेक दिवस आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकरी राजाचा चेहरा मान्सून धो धो बरसल्याने आनंदित झाला आहे. तर पावसाच्या दमदार सुरुवातीने लावणीच्या कामाला आता वेग आला असून, शेतकरी राजाची चिंता मिटल्याचे दिसून येत आहे.
या वर्षी मान्सून वेळेवर सुरू होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु लावणी झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती, त्यामुळे जून महिना कोरडाच गेला. रोपे सुकण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर गेली दोन दिवस पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. कोरोना काळात व्यापार-उद्योग बंद आहेत. हाताला काम नाही, असे असताना अनेकांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे रोह्यात शेती बहरणार आहे. त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकºयाला अपेक्षा आहे. शेतकरी नवीन विकसित बियाण्यांचा वापर करीत असल्याने तांदूळही चांगल्या प्रतिचा मिळत आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर भातशेतीला पुन्हा एकदा महत्त्व आले आहे. यामध्ये कृषी खात्याचे मार्गदर्शन मिळत आहे.

नदीचे पाणी रस्त्यावर; कार्लेचा संपर्क तुटला
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यामध्ये गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. सर्व परिसर पूर्णत: जलमय झाला असून, भातशेतीच्या कामांना वेग आला आहे. संततधार पावसाने बोर्लीपंचतन दिघी मार्गावर शिस्ते गावाजवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीस रात्रीच्या सुमारास बंद करण्यात आला होता. कार्ले नदी दुथडी भरून वाहू लागल्याने कार्ले गावाचा संपर्क तुटला होता.
मागील पाच दिवस पावसाची संततधार चालू राहिल्याने बोर्लीपंचतन परिसरामध्ये पावसाने चांगलीच दाणादाण उडाली, तर कार्ले, कुडकी, रानवली लघू पाटबंधारे धरणातील जलसाठ्यामध्ये चांगली वाढ झाली. बोर्लीपंचतन गावाला सहा महिने पाणीपुरवठा करणारे कोंढेपंचतन धरण पूर्ण भरून वाहू लागले.
श्रीवर्धन-बोर्ली मार्गावरील कार्ले गावाकडे जाणारी नदी पावसामध्ये दुथडी भरून वाहत होती. या नदीमध्ये प्रचंड गाळ असल्याने कार्ले गावाकडे जाण्यासाठी असलेला पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे गावातील नागरिकांना मुख्य बाजारपेठ, अत्यावश्यक वैद्यकीय उपचारासाठीही जाता येत नसल्याने, मोठी गैरसोय कार्ले गावातील नागरिकांची होत आहे. हि परिस्थिती दर पावसाळ्यात असते.

६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सखल भागात पाणी साचले होते. अचानक पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. भातलावणीचे काम सुरू असतानाच पाऊस आल्याने बळीराजा सुखावला होता. येत्या ६ जुलैपर्यंत अशाच मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमारांनाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Raigad district was lashed by rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.