लॉकडाऊनदरम्यान अनेकांना भरमसाट वीज बिले आली. राज्य सरकारकडून बिलांबाबत सूट मिळेल असे आधी जाहीर केले होते. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने हात वर केले. वीज प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. त्या विरोधात मनसेच्या वतीने ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. तर कृषी, कामगार कायद्याविराेधात शेकापने अलिबाग येथे माेर्चाचे आयाेजन केले हाेते. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यामुळे गुरुवारचा दिवस आंदोलन आणि मोर्चाचा ठरला.
मनसैनिक कर्जत प्रांत कार्यालयावर धडकले
कर्जत : कोरोनाच्या काळात बुडालेला रोजगार आणि घटलेले उत्पन्न अशा कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिक हे वाढीव बिल भरू शकणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने वाढीव वीज बिल माफ करावे आणि नागरिकांना वीज बिलात युनिटमध्ये जी सूट देण्याची घोषणा केली होती तो शब्द पाळावा, या मागणीसाठी कर्जत आणि खालापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर प्रांत अधिकारी यांना निवेदन देताना शासनाने वीज बिल कमी केले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत आणि खालापूर तालुक्याच्या वतीने वीज बिल कमी करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते. कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेला मोर्चा आमराई पुलावरून प्रांत कार्यालयावर पोहोचला. तेथे पोलिसांनी प्रांत अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चेकऱ्यांना रोखले. या वेळी मनसेच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांना भेटून निवेदन दिले. मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत आणि खालापूर तालुक्यातील मनसेचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जे. पी. पाटील, मनसेचे जिल्हा सचिव प्रवीण गांगल, वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष धनंजय दर्गे, कर्जत तालुका अध्यक्ष अंकुश शेळके, तालुका उपाध्यक्ष यशवंत भवारे, प्रवीण बोराडे, तालुका उपाध्यक्ष महेंद्र निगुडकर, कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण, सचिव प्रवीण पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णूक, खालापूर महिला सरचिटणीस हेमलता चिंबुळकर यांनी पक्षाच्या वतीने निवेदन सादर केले.