Holi 2020: रायगड जिल्ह्यात यंदा ४ हजार होळ्या; विविध कार्यक्रमांची रेलचेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:44 PM2020-03-08T23:44:23+5:302020-03-08T23:44:54+5:30
पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त; कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
निखिल म्हात्रे
अलिबाग : जिल्ह्यात होळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त रविवारी ठिकठिकाणी होळीच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू होती. बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी होती. रायगड पोलीस क्षेत्रात सोमवारी ४ हजार ३ होळ्या उभारण्यात येणार आहेत. होळी पौर्णिमा आणि धूलिवंदन सण साजरा होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड पोलीस विभागानेही सर्वत्र बंदोबस्त ठेवला आहे.
रायगड जिल्ह्यात होळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात येते. शहरीकरणामुळे होळीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप बदलले असले तरी शेवटच्या दिवशी सर्वत्र धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. केळी, सावरी, पोफळीचे झाड होळीसाठी वापरले जाते. सकाळीच होळीचे वृक्ष होळी लावण्याच्या ठिकाणी उभारून त्याची विधिवत पूजा होते. त्यानंतर होळीचे पूजन केले जाते. रात्री बाराच्या सुमारास होळी पालापाचोळ्याने पेटविली जाते.
श्रीवर्धन तालुक्यामधील बोर्ली पंचतन गावच्या ग्रामदेवतेचा चिंचबादेवीचा होलिकोत्सव प्रसिद्ध आहे. पारंपरीक पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जात असून विविध कार्यक्रमांची रेलचेल बोर्ली पंचतनच्या शिमग्याचे आकर्षण असते.
बोर्ली पंचतनसह परीसरातील कापोली, शिस्ते, वडवली, वेळास आदगाव, दिघी, कुडगाव, खुजारे, वांजळे कोंढेपंचतन व अन्य विविध गावांमध्ये शिमगोत्सव साजरा केला जातो. तर मुख्य बाजारपेठ असलेल्या बोर्ली पंचतन गावच्या शिमगोत्सव प्रमुख आकर्षण ठरला आहे.
बोटी लागल्या किनाºयाला
1) मुरूड जंजिरा : कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा मिळाला असून मत्स्य व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, नवी मुंबई, मुंबई, वसई, विरार आदी भागांत कोळी समाजाची संख्या खूप मोठी आहे.
2) समुद्रात मासळी पकडून ती मुंबई येथील ससून डॉक येथे विकली जाते. सध्या होळी सणानिमित्त समुद्रात गेलेल्या बोटी किनाºयावर परतू लागल्या आहेत.
3)मुरूड तालुक्यातील नांदगाव, राजपुरी, एकंदर, आगरदांडा, दिघी येथे शेकडो बोटी किनारी लागल्या असून पारंपरिक वेशभूषा, अनेक वस्तूंच्या खरेदीला पसंती दिली जात आहे.
मुंबईतून निघताना बोटी विविधरंगी-कापडाच्या झुलीने सजविल्या जातात. विविध फुले, पताका, झेंडे व कोळी लोक पारंपरिक वेशभूषा परिधान करून प्रथम खंदेरी येथे वेताळ देवाचे दर्शन घेऊन, पूजाअर्चा करून बोटी मुरूडमध्ये दाखल होत असल्याची माहिती मुरूड येथील चंद्रकांत सरपाटील यांनी दिली.
मुरूड तालुक्यात सुमारे ७५० होड्या असून बहुतांश होड्या किनाºयाला लागलेल्या आहेत. होळीनिमित्त सामाजिक आशय घेऊन व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन असे देखावे तयार करून जनजागृतीसुद्धा केली जाते.
पेणमध्ये उंच होळ्या
कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात होलिकोत्सव विविध पद्धतीने साजरा केला जातो. रायगडातील पेण तालुक्यातील होलिकोत्सवात उंच होळ्या हे एक आकर्षण ठरत आहे. शहरातील कोळीवाडा आणि कुंभार आळी या दोन ठिकाणच्या होळ्या सर्वात उंच असल्याने सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात.
होलिकोत्सवाच्या ८ ते १० दिवस अगोदरच जंगलात जाऊन पेणमधील नागरिक होळी आणतात आणि त्या होळीला सुशोभित करून उभ्या केल्या जातात. कोळीवाडा, कुंभारआळी, नंदिमाळ नाका, चिंचपाडा, कौंडाळ तळे, फणस डोंगरी यासह अन्य भागांत शेकडो होळ्या उभारल्या जातात.
खारेपाटात सावरीच्या झाडाची होळी
यंदा होळी सणात पारंपरिक वाद्याबरोबर डीजे, लेझर लाइट अशी आधुनिकतेची जोड उत्सवात पाहायला मिळत आहे.
खारेपाटात विशेषत: सावरीच्या झाडाची होळी जंगलातून आणली जाते. यासाठी गावातील तरुणांसह ज्येष्ठ मंडळीही हिरिरीने सहभागी होतात. वाजतगाजत, गुलालाची उधळण करीत गावात होळी उभी केली जाते. तिची विधिवत पूजा केली जाते. या वेळी महिला होळीची पारंपरिक गाणी गातात. होळी उत्सवापासून रंगपंचमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे परिसरात आयोजन करण्यात येते.