कार्लेखिंड : खारेपाट महोत्सवातून रायगडची संस्कृती यातून खऱ्या अर्थाने अनुभवण्यास मिळाली, त्याचबरोबर महिला सक्षमीकरणात या जिल्ह्याने घेतलेली उत्तुंग झेपही पाहता आली. सर्वांनी अनुकरण करावे अशीच ही महिलांची झेप आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले आहेत.झेप फाऊंडेशन आयोजित खारेपाट महोत्सवाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले. पवार म्हणाले की, हिंदवी स्वराज्यासाठीचा लढा, भारतीय स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्ये रायगड जिल्ह्यातील नररत्नांनी दिलेले योगदान अनन्य साधारण आहे. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुजन हितवादी विचारांची पताका रायगड जिल्ह्यात ना. ना. पाटील यांनी रूजविली, वाढविली. त्यामुळे महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा लौकिक खऱ्या अर्थाने सर्वदूर पोहाचल्याचे पाहण्यास मिळते. रायगड जिल्ह्यातील पाटील घराण्याची चौथी पिढी जनतेच्या सेवेत रूजू आहे, याचा अभिमान वाटतो. अशा महोत्सवामधून रायगडच्या लोकसंस्कृतीचे जे यथार्थ दर्शन झाले त्यामुळे आम्हालाही इथली संस्कृती अनुभवता आली. इथली जीवनशैली आणि इथल्या माणसाच्या मनातील संस्कृती ठेव त्या निमित्ताने पाहताना उर भरून येतो. खारेपाट महोत्सवाच्या माध्यमातून उद्योजक निर्मिती आणि महिला सक्षमीकरण करण्याची झेप फाऊं डेशनची धडपड उल्लेखनीय असल्याचे पवार यांनी अखेरीस नमूद केले.आमदार जयंत पाटील यांनी माझा रायगड जिल्ह्यातील खारेपाट कसा आहे याचे चित्र मांडले आहे. सांबरी ते नवखारपासून ८४ गावांचा असलेला खारेपाट भाग विविध क्षेत्रामध्ये प्रसिध्द आहे आणि येथील संस्कृती वेगवेगळ्या कलागुणांनी सजलेली आहे. संस्कृती जपण्याचे काम आम्ही करत आहोत. नवीन पिढीला कळण्यासाठी आम्ही हे आयोजन करत असल्याचे सांगितले.यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे, शेकाप नेते आ. जयंत पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. पंडित पाटील, खारेपाट पर्यटन महोत्सव झेप फाऊंडेशन अध्यक्षा चित्रा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती नेत्या आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रघुजीराजे आंग्रे,रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, आंबेपूर सरपंच भावना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्ह्याची महिला सक्षमीकरणासाठी उत्तुंग झेप
By admin | Published: December 22, 2016 6:24 AM