- मधुकर ठाकूरउरण - मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे. उरण परिसरात मागील पाच -सहा दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे.कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विंधणे-दिघोडे,वशेणी-दिघाटी-केळवणे, नवघर फाटा- जेएनपीए वसाहत,केगाव-विनायक, कोप्रोली-खारपाडा, कंठवली - वेश्वी,जासई -गव्हाणफाटा आदी रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
चिरनेर गावात पाणी शिरल्याने गावाला पुराचा वेढा पडला आहे.सुमारे ३५०-४०० घरात पुराचे पाणी शिरल्याने रहिवाशांना रात्र जागुन काढावी लागली आहे. उरण शहरातील कुंभारवाडा , इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, गणपती चौक, पालवी,आपला बाजार परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
तालुक्यातील नवघर,पागोटे, जेएनपीए कामगार वसाहत,करळ-सोनारी, जसखार,नागाव,म्हातवली, केगाव,भेंडखळ,मोठीजुई आदी अनेक गावात पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे उरण परिसरातील अनेक कंटेनर यार्डही पाण्याखाली गेले आहेत. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे जेएनपीए बंदराकडे ये-जा करणाऱ्या कंटेनर मालाच्या वाहतूकीवरही विपरीत परिणाम झाला आहे.कंटेनर मालाची वाहतूक मंदावली असल्याची माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भाटे यांनी दिली.
चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे मात्र उरण परिसरातील नागरिकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. उरण परिसरातील शाळा महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.अनेक ठिकाणच्या गावातील मंगळवारी रात्रीपासून बत्ती गुल झाली आहे.बुधवारी सकाळपर्यंत तरी वीजेचा थांगपत्ता नाही.त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.
उरण तालुक्यात मंगळवारपासुन बुधवारी सकाळपर्यंत अवघ्या २४ तासात १६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चिरनेर,जासई, जसखार,कंठवली,वैश्विक,विंधणे आदी गावातील अनेक घरात पावसाच्या पुराचे पाणी शिरले आहे. काही मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोकादायक ठरू पाहाणारे रस्ते तुर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पुरसदृश्य गावातील नागरिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी,तलाठी, कोतवाल , ग्रामसेवक तैनात करण्यात आले आहेत.सद्यस्थितीत वित्तहानी वगळता कुठेही जीवितहानी झालेली नाही.पुरसदृश स्थीतीकडे प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण तहसीलदार उध्दव कदम यांनी दिली.