Raigad: लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, मतदानयंत्र हाताळणीचा अधिकाधिक सरावासाठी प्रयत्न
By निखिल म्हात्रे | Published: April 17, 2024 11:20 AM2024-04-17T11:20:43+5:302024-04-17T11:21:34+5:30
Raigad News: अलिबाग-मुरुड मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथील मेघा चित्रमंदिरात प्रथम प्रशिक्षण सोमवार, मंगळवारी घेण्यात आले.
- निखिल म्हात्रे
अलिबाग - अलिबाग-मुरुड मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथील मेघा चित्रमंदिरात प्रथम प्रशिक्षण सोमवार, मंगळवारी घेण्यात आले. विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक आणि अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवस निवडणूक कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मतदान कार्यपद्धती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच वेळेचा अपव्यय होऊ नये, यासाठी यंत्र हाताळणीचा अधिकाधिक सराव व्हावा, यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रशिक्षण अलिबाग येथे मेघा चित्रमंदिरात घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीत सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावून निवडणूक आयोगाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवडणूक प्रशिक्षक तथा अपर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, मुरुड तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार अजित टोळकर उपस्थित होते.
मतदानापूर्वीचा मॉकपोल सकाळी साडेपाच वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत अशी ११ तास मतदानाची वेळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मतदान पोस्टल बॅलेट पेपरद्वारे करण्याचे आवाहन अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले.