- मधुकर ठाकूर उरण - चिरनेर खारपाटील- ठाकूर सहकारी मच्छीमार सोसायटीचा अनावरण सोहळा रविवारी (२३) स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. चिरनेरचे उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते या मच्छीमार सोसायटीचे अनावरण करण्यात आले.
चिरनेर खाडीक्षेत्रावर अनेक मच्छीमार पिढ्यानपिढ्या मच्छीमारी करीत आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवित आहेत.मात्र पारंपारिक मच्छीमारी व्यवसाय आता डबघाईला आला आहे . त्यामुळे येथील मच्छीमारांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या सहकारी मच्छीमार सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे.ही नोंदणीकृत मच्छीमार सोसायटी येथील स्थानिक मच्छीमार कुटुंबियांसाठी वरदान ठरणार असून या मच्छीमारी सोसायटीमुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण, हॉटेल व्यवसाय, रिसॉर्ट यामुळे मासळीची वाढती मागणी पाहता भविष्यात हा मच्छीमारीचा व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळेच या सहकारी मच्छीमार सोसायटीची स्थापना केल्याचे अध्यक्ष प्रफुल्ल खारपाटील यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला.
याप्रसंगी राजिपचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे, व्हाईस चेअरमन गजानन वशेणीकर, चिरनेरचे पोलीस पाटील संजय पाटील, ग्राहक संरक्षक मंचाचे अध्यक्ष शशांक ठाकूर, काँग्रेसचे उपाध्यक्ष घनश्याम पाटील, इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत, चिरनेर ग्रा.प. सदस्य समाधान ठाकूर, ग्रा. प. सदस्या निकिता नारंगीकर, नीलम चौलकर, जयश्री चिर्लेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.