Raigad: उन्हाचे चटके मुलांनाही नकोसे, मैदाने पडली ओस; बैठ्या खेळांना पसंती
By निखिल म्हात्रे | Published: April 19, 2024 10:13 AM2024-04-19T10:13:10+5:302024-04-19T10:13:37+5:30
Raigad News: शाळांना सुट्ट्या लागल्या की घराचे अंगण, सोसायट्यांचे पॅसेज आणि मैदानांवर मुलांचे मैदानी खेळ रंगतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य मैदाने सकाळी नऊनंतर ओस पडू लागली आहेत.
- निखिल म्हात्रे
अलिबाग - शाळांना सुट्ट्या लागल्या की घराचे अंगण, सोसायट्यांचे पॅसेज आणि मैदानांवर मुलांचे मैदानी खेळ रंगतात; मात्र गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य मैदाने सकाळी नऊनंतर ओस पडू लागली आहेत.
बहुतांश मुलांच्या वार्षिक परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. दोन महिने सुट्टी मिळत असल्याने या दिवसांत मैदानी खेळाकडे मुलांचा कल वाढतो; परंतु उन्हाच्या झळा या असह्य असल्याने घरातील बैठे खेळ खेळणेच मुले पसंत करत आहेत. पालक काळजीपोटी उन्हामुळे बाहेर मैदानात मुलांना खेळायला पाठवत नाहीत. परिणामी, मैदानी खेळांवर याचा परिणाम दिसून येत आहे.
मैदानी खेळांकरिता सायंकाळी सातनंंतर मुले बाहेर पडत आहेत. तसेच सकाळी नऊ वाजतापर्यंतच मुले बाहेर फेरफटका मारत असून १० नंतर सूर्य डोक्यावर चढू लागला की मुले घराचा रस्ता धरतात. यामुळे सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत मैदान मुलांविना मैदाने ओस पडत आहेत.
शाळांना सुट्टी लागताच मैदाने मुलांच्या किलबिलाटाने गजबजून जातात. तसेच उन्हाळी खेळांची शिबिरे देखील भरवली जातात. मात्र, यंदा उन्हाचा तडाखा पाहता अद्याप या शिबिरांना सुरुवात झालेली नाही. यामुळे परीक्षा संपून घरात अडकलेल्या मुलांना नक्की कोणत्या खेळात आता गुंतवायचे, असा मोठा प्रश्न पालकांसमोर पडला आहे. नाटक, नृत्य, चित्रकला अशा बैठ्या प्रकारांतील कला शिबिरांना पालक मुलांना घालून त्यांची मनधरणी करत आहेत; परंतु खेळायला काही मिळत नसल्याने मुले देखील खेळांच्या शिबिरांची वाट पाहत आहेत.
- दर्शन म्हात्रे, पालक
वाढत्या उन्हामुळे बैठ्या खेळाकडे मुलांचा कल दिसत आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने मुले घरीच थांबणे पसंत करत आहेत. तसेच कुलर, फॅनखाली अथवा वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून मोबाइल गेम, टीव्ही, लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर ऑनलाइन गेमिंग, कॅरम अशा बैठ्या खेळाला पसंती देताना मुले पसंती देत आहेत.
- यतिराज पाटील, क्रीडा शिक्षक
मैदानी खेळ खेळताना शारीरिक ऊर्जा जास्त प्रमाणात खर्च होते. शहरातील तापमान पाहता जास्त प्रमाणात घाम येऊन थकवा येत असल्याने तसेच आई-बाबादेखील घराबाहेर जाण्यास मनाई करतात.
- शुभम पाटील, विद्यार्थी
उन्हाच्या झळा तीव्र असल्याने मैदानात मातीवर पाय भाजतात. शूज घालून खेळता येत नाही. शिवाय ऊन जास्त असल्याने आम्ही सावलीत खेळतो.
- प्राप्ती म्हात्रे, विद्यार्थी