मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 07:15 AM2024-11-09T07:15:52+5:302024-11-09T07:16:28+5:30

Raigad News: विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदारराजाला पुढील पाच वर्षांची रंगीत स्वप्ने दाखविण्यात राजकीय पक्ष मश्गुल असताना सर्वांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालेल असे विदारक चित्र पेण तालुक्यात समोर आले आहे.

Raigad: Farfat even after death, a body carried in a bag, a four-kilometer walk as there is no road, a heartbreaking picture in pen. | मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र

मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र

- नरेश पवार
वडखळ - विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत मतदारराजाला पुढील पाच वर्षांची रंगीत स्वप्ने दाखविण्यात राजकीय पक्ष मश्गुल असताना सर्वांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालेल असे विदारक चित्र पेण तालुक्यात समोर आले आहे. एका अभागी आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी मात्र चार किमीची पायपीट करावी लागली. केवळ पक्का रस्ता नसल्याने ही वेळ आदिवासी कुटुंबावर आली. रस्ता तयार करण्यासाठी ठेकेदाराला दिलेले साडेसात कोटी कोणाच्या खिशात गेले, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

पेण तालुक्यातील खवसा ही छोटी आदिवासी वाडी. या वाडीतील आंबी कडू (४२) ही महिला आजारी होती. तिला उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी तिचा मृत्यू झाला. आंबी कडू यांचा मृतदेह रुग्णवाहितेकून पेणपर्यंत आणण्यात आला. शहरापासून पाच किमी अंतरावर बोरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खवसा आदिवासी वाडीपर्यंत जायला पक्का रस्ताच नाही. त्यामुळे कोणतीही रुग्णवाहिका अथवा खासगी वाहन उपलब्ध झाली नाही. अखेरीस ग्रामस्थांनी झोळी करून मृतदेह खवसावाडीत नेला. याबाबत आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे. या वाडीपर्यंत रस्ता करण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी ७ कोटी ६० लाखांचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, त्याकडे ठेकेदाराने साफ दुर्लक्ष केले. 

मागील वर्षी ठेकेदाराने रस्त्यासाठी थोडा भराव टाकला होता. मात्र पावसाळ्यात तो धुवून गेला. रस्ताच नसल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. - काळ्या पद्मा कडू, ग्रामस्थ, खवसावाडी, पेण

गेल्या दोन वर्षापासून येथील खवसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, तांबडी आणि उंबरमाळवाडी या पाचही आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या वाड्यांच्या रस्त्यांसाठी १ जानेवारी रोजी पुन्हा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने दहा महिने उलटूनही या रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. - संतोष ठाकूर, अध्यक्ष, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था 

१८४ आदिवासी वाड्या 'नॉट रिचेबल'
रायगड जिल्ह्यात तीनशेच्या आसपास वाड्या-वस्त्या आहेत. यातील १८४ वाड्यांवर आजही पक्के रस्ते नाहीत. जानेवारीमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या एका सर्वेक्षणातच हे उघड झाले आहे. यातील बहुतांश ठिकाणी रस्ते नसल्याने वाहने जात नाहीत. त्यामुळे तेथील आदिवासी बांधवांना झोळीतून रुग्णांची वाहतूक करावी लागत आहे

Web Title: Raigad: Farfat even after death, a body carried in a bag, a four-kilometer walk as there is no road, a heartbreaking picture in pen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.