रायगड : जिल्ह्यात पहिले पासपोर्ट कार्यालय पनवेलमध्ये, नवीन पनवेलमध्ये होणार मुख्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:47 AM2018-01-23T02:47:37+5:302018-01-23T02:48:27+5:30
रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असलेल्या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात नव्हे तर नवी मुंबई परिसरात एकही पासपोर्ट कार्यालय नसल्याने नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी थेट ठाणे गाठावे लागत आहे.
वैभव गायकर
पनवेल : रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका असलेल्या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात नव्हे तर नवी मुंबई परिसरात एकही पासपोर्ट कार्यालय नसल्याने नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी थेट ठाणे गाठावे लागत आहे. यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल शहरात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय असावे याकरिता परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले आहे. मात्र यासंदर्भातील काही बाबी पूर्ण होण्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने पनवेलकरांना पासपोर्ट कार्यालयासाठी आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शनिवारी खासदार श्रीरंग बारणे पनवेलमध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत पनवेल पासपोर्ट कार्यालयासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी एक ते दीड महिन्यात नवीन पनवेल येथील पोस्ट आॅफिसमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू होणार असल्याचे सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने या पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी दिली आहे. पासपोर्टचे मुंबई क्षेत्रीय कार्यालयानेही पनवेलच्या पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट कार्यालयाचे मंजुरीचे पत्र पाठविले आहे.
नवीन पनवेल येथील पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी दिल्लीतील मुख्यालयात पत्रव्यवहार करून मंजुरी मिळाली आहे. पासपोर्ट कार्यालयाच्या मुंबई क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता, पनवेलमध्ये पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू होणार आहे. याकरिता पोस्ट खाते दिल्लीला परवानगीसाठी पत्रव्यवहार करेल. त्या ठिकाणाहून मंजुरी मिळाल्यास पोस्ट खात्यामार्फत तशा सूचना आम्हाला दिल्या जातील. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयासाठी आवश्यक बाबी, अंतर्गत सजावट आदींचा विचार केला जाईल. या सर्व प्रक्रि येकरिता कमीत कमी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता कुलकर्णी यांनी वर्तवली.
पनवेल हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती असे ठिकाण आहे. त्यामुळे याठिकाणी पोहचणे सोयीचे आहे. सध्या रायगड जिल्ह्यातील रहिवाशांना पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे शहर गाठावे लागते. दळणवळणाच्या दृष्टीने हे अंतर जास्त आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयामार्फत दिलेल्या वेळेत पोहोचणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे पासपोर्ट मिळण्यास विलंब होतो. पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय झाल्यास नागरिकांच्या वेळेची बचत होईल, शिवाय पासपोर्ट वेळेत उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांचा पाठपुरावा-
रायगड जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र असे पासपोर्ट कार्यालय नव्हते. दररोज पासपोर्टची हजारो आवेदन संपूर्ण रायगड जिल्ह्यातून पासपोर्ट कार्यालयांत जात असतात.
त्यादृष्टीने रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र असे पासपोर्ट कार्यालय गरजेचे होते. खासदार बारणे यांच्या पाठपुराव्यानंतर पनवेलमध्ये हे उभारण्यात येणारे हे कार्यालय संपूर्ण नवी मुंबईचे मुख्यालय असेल.
पासपोर्ट आवेदनात खारघर जिल्ह्यात अव्वल
पनवेल तालुक्यातील उपनगर खारघर हे मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. याठिकाणची लोकसंख्या देखील ३ लाखांच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण रायगड जिल्ह्यात पासपोर्ट आवेदनाच्या बाबतीत खारघर शहर अव्वल आहे. २०१७ मध्ये जवळजवळ साडेसात ते आठ हजार नागरिकांनी याठिकाणी पासपोर्टसाठी अर्ज केले होते.
पनवेलमधील पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू होणार आहे. याकरिता पोस्ट खाते दिल्लीला ते परवानगीसाठी पत्रव्यवहार करेल. पोस्ट खात्याची मंजुरी मिळताच पासपोर्ट कार्यालय उभारणीचे काम हाती घेतले जाईल. मात्र या प्रक्रि येकरिता कमीत कमी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
- डॉ. स्वाती कुलकर्णी, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी, मुंबई विभाग