रायगडमध्ये पहिल्याच पावसाने घेतले दोन बळी; रायगडावर दगड पडून पुण्यातील शिवभक्ताचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 09:48 AM2023-06-05T09:48:47+5:302023-06-05T09:49:36+5:30
मान्सूनपूर्व पावसाने रविवारी रायगड जिल्ह्यात काही भागांत हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क, खोपोली / महाड : मान्सूनपूर्व पावसाने रविवारी रायगड जिल्ह्यात काही भागांत हजेरी लावली. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दोघांचा मृत्यू झाला आहे. खालापुरात नदीकाठी मासेमारी करताना झाड पडल्यामुळे भगवान जाधव या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक मुलगी जखमी झाली, तर रायगड पाहून पायऱ्या उतरणाऱ्या तरुणावर घरंगळत आलेला दगड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. हा तरुण पुणे येथून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आला होता. मृत तरुणाचे नाव प्रशांत गुंड (वय २८) असे आहे.
खालापुरात नदीकाठी मासेमारी करताना झाड पडल्यामुळे भगवान जाधव या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर खोपोली नगर परिषद हद्दीतील वासरंग येथे झाड पडल्यामुळे एक मुलगी जखमी झाली आहे. तिला एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी किल्ले रायगड परिसरात वादळी वारा झाला. त्याचबरोबर जोरदार पाऊसदेखील पडला. या वादळी पावसामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त उभे केलेले तात्पुरते निवारा शेड, स्वच्छतागृह, नियंत्रण कक्ष, तंबू हवेत उडून गेले. याचदरम्यान किल्ले रायगड उतरत असणाऱ्या एका तरुणावर वरून घरंगळत आलेल्या दरडीतील एक दगड अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत गुंड व त्याचा मित्र असे दोघेजण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आले होते.
पालघरमध्ये रविवारी सकाळी ठिकठिकाणी सुमारे अर्धा तास मान्सूनपूर्व पाऊस झाला. मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील काही भागात रविवारी पावसाचा शिडकावा झाला. भिवंडीत पडघा येथे दुपारी थाेडासा पाऊस झाला. तर ठाणे शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण हाेते. शहापूर तालुक्यात दुपारपासूनच वासिंद, कसारा, आटगाव, भातसानगर, डोळखांब, किन्हवली पट्ट्यासह शहापूरमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या.