निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझा नातेवाईक आहे. जे त्याचे दुःख, ते माझे दुःख असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या. मृतांची व त्यांच्या नातेवाइकांची अवस्था पाहून घटनास्थळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर म्हाडाकडून करण्यात येणारे पुनर्वसन उत्कृष्ट दर्जाचे व्हावे म्हणून प्रयत्न असणार आहे, असे तळीये दुर्घटनेतील अनुभव सांगताना निधी चौधरी यांनी लोकमतला सांगितले.
महाड तालुक्यातील भोर घाट रस्त्यावर शिंदे वाडी येथून सहा ते सात किलोमीटर डोंगर भागात तळीये हे गाव होते. या गावाची लोकसंख्या होती २४१, मात्र आता फक्त १५६ जण आहेत. गावात उरलेली १५६ ग्रामस्थांपैकी १०९ ग्रामस्थांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची पालक म्हणून दरड ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी माझी राहील. प्रामुख्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लोकमतला सांगितले.
जिल्ह्यात १०३ दरडग्रस्त गाव आहेत. यामध्ये तळीये गाव नव्हते, तरी येथे दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ५२ जिल्हावासी मृत्युमुखी पडले आहेत, तर ३३ जणांचे शोधकार्य अद्याप सुरू आहे. माझ्या जिल्ह्यावर आलेली काळरात्र वेदनादायी ठरली आहे. ही दुर्दैवी घटना कधी विसरता येणार नाही, असे निधी चौधरी यांनी भावनाविवश होऊन सांगितले. तळीये येथे आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी लांबवरून नातेवाईक आले होते. घटनास्थळीच चित्र पाहता नागरिकांचा आक्रोश केला, त्यांच्या भावना समजून घेत मृतांच्या नातेवाइकांना भावनिक आधार दिला.