निखिल म्हात्रे अलिबाग (जि. रायगड) : ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सजला आहे. जिल्हा प्रशासनाने ३३ समित्यांचे गठन केले आहे. काही छोटी-मोठी दुरुस्तीची कामे वगळता कार्यक्रम स्थळाची तयारी पूर्णत्वास आली आहे. या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ वैद्यकीय सेंटर्स तैनात केली आहेत. शुक्रवारी सकाळपासून सोहळ्याला सुरूवात होणार आहे.
गडाच्या पायथ्याशी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात ३ हेलिपॅड तयार ठेवले आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवली आहे. तर गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजामार्गेच गडावर यावे तसेच हृदयविकार, मधुमेह आणि श्वसन विकार असलेल्या व्यक्तींनी गडावर येणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या संदेशाचे प्रक्षेपणशुक्रवारी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
गडाच्या पायथ्याशी ४० हजार लिटर पाणीसाठागडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. संपूर्ण रायगड किल्ले परिसरात २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला आहे.शिवभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी १ हजार दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था केली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर १० हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी ४० हजार लिटर पाणीसाठा करण्यात आला आहे.
अवजड वाहतुकीस बंदीमुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ टनपेक्षा अधिक अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घातली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते पळस्पे, वाकण फाटा ते खोपोली व इतर राज्य मार्गावर वाळू रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांना बंदी आहे. ३१ मे ते २ जून रात्री १२ वाजेपर्यंत तसेच ४ जून रोजी ते ६ जूनपर्यंत ही बंदी असेल.