अनंत गीते राखणार रायगडचा गड? सुनील तटकरेंचं कडवं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 10:45 PM2019-03-13T22:45:01+5:302019-03-13T22:47:26+5:30
रायगडमध्ये गीते आणि तटकरेंमध्ये जोरदार लढतीचा अंदाज
गीतेंच्या विजयातील अडसर
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून सेनेच्या गोटात तत्कालीन उमेदवार आणि विद्यमान दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख रवि मुंडे यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजी होती. परिणामी, काहींनी सेनेला जय महाराष्ट्र करून पक्षही सोडले. या नाराजीचे फटके तळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत शिवसेनेला चांगलेच बसलेले आहेत. आमदार भरत गोगावले यांचे पाठबळ लाभले असल्याने मुंडे यांचे जिल्हाप्रमुखपद अबाधित असले तरीही या मतदारसंघात सेनेत असलेली नाराजी आणि धुसफूस ते दूर करू शकलेले नाहीत. झालेली गळतीही ते थांबवू शकलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत हिबाब आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या पथ्यावर पडणार आहे. युतीचे उमेदवार गीते यांच्यासाठी या निवडणुकीत ही मोठी डोकेदुखी होणार असल्याचे दिसून येत आहे. रोहा तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत धाटावमध्ये सेना नेतृत्वाने माजी सरपंच विनोद पाशिलकर यांच्या विरोधातील उमेदवारी आयत्या वेळी माघार घेत त्यांची निवडणूक हेतूपूर्वक बिनविरोध केली होती. त्याचबरोबर सरपंचपदासाठी बलाढ्य असलेल्या अपक्ष उमेदवारास पाठिंबा न देता, तिसरा उमेदवार उभा करून सेनेने विरोधी मतांची विभागणी केली. पाशिलकरांना पडद्यामागून मदत केल्याने धाटाव विभागात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
गीतेंची जमेची बाजू
गीते हे शांत, संयमी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निष्कलंक चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्यावर आजवर कुठलेही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. गीते हे सरळमार्गी आहेत, देशस्तरावर त्यांचा प्रशासकीय अभ्यास गाढा असून ते नेहमी अभ्यासपूर्ण विवेचन करतात. या मतदारसंघात असलेले कुणबी समाजाचे प्राबल्य ही गीतेंची जमेची बाजू आहे. भाजपाबरोबर झालेली युती आणि निर्णयक्षम पंतप्रधान म्हणून तरु णवर्गात मोदींबाबत असलेले आकर्षण, यातच नुकतेच झालेले एअर स्ट्राइक या सर्वाचा लाभ अनंत गीते यांना होणार आहे. त्याचबरोबर भाजपात गेलेले माजी मंत्री रवि पाटील आणि रामदास कदम यांच्या सोबत झालेली दिलजमाई ही गीतेंची जमेची बाजू राहणार आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व तटकरेंवर झालेले जलसिंचन भ्रष्टाचार, बोगस कंपन्या आणि मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपांमुळे, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून याचा लाभ गीते यांना मिळणार आहे.
तटकरेंच्या वाटेतील अडसर
‘जे पेरले ते उगवते’ याप्रमाणे सुनील तटकरे यांनी आजवर जिल्ह्यात केलेले राजकारणच आता त्यांच्या वाटेतील अडसर होताना दिसून येत आहे. आघाडीचे ते उमेदवार आहेत. मात्र, जिल्हा परिषदेत आघाडी करताना त्यांनी काँग्रेस पक्षाला खड्यासारखे बाजूला केले, त्यांना आघाडीत स्थान दिले नाही. त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांसोबत त्यांचे ताणले गेलेले संबंध त्यांना त्रासदायक होणार आहेत. तटकरेंचे राजकीय गुरू माजी मुख्यमंत्री दिवंगत अ. र. अंतुले यांच्या सोबतही त्यांचे संबंध टोकाला गेले होते. याची कुठेतरी नाराजी त्यांना लोकसभा निवडणुकीत सहन करावी लागणार आहे. पेण विधानसभा निवडणुकीत आघाडी असतानाही त्यांचे भाऊ अनिल तटकरे यांनी आघाडीच्या विरोधात उमेदवारी केली होती. आघाडीचे उमेदवार माजी मंत्री रवि पाटील यांना त्यामुळे पराभव सहन करावा लागला होता. घरात भांडणतंटा आहे, असे भासवून काँग्रेसला त्यांनी फसवल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचबरोबर सर्व पदे आपल्याच घरामध्ये राहिली पाहिजेत, जिल्ह्यात इतर कुणालाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. ही मतदारांत असलेली भावना तटकरेंसाठी डोकेदुखी ठरणारी आहे.
तटकरेंची जमेची बाजू
तटकरेंकडे असलेली धनसंपदा ही तटकरेंची सर्वात मोठी जमेची बाजू राहिली आहे. मागील विधानपरिषद स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी ते दाखवून दिलेले आहे. त्या जोरावर याही निवडणुकीत ते आपला करिष्मा दाखवतील, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याचबरोबर तटकरेंची स्वत:ची निवडणूक असली की त्यांचे सर्व कौटुंबिक विवाद क्षमतात आणि ते एकत्र येतात, असा अनुभव जिल्हा परिषद निवडणुकांत राहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे हे त्यांच्या सोबतीला असणार आहेत. अथवा पडद्या मागून त्यांच्यासाठी आवश्यक ते सर्वकाही करणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. ही तटकरेंची जमेची बाजू राहणार आहे. याशिवाय नगरपालिका निवडणुकीदरम्यान आमदार अवधूत तटकरे यांची सेना नेते आणि काही शिवसैनिक यांच्या सोबत झालेली जवळीक व सेना नेत्यांची त्यांच्या निवास्थानी वाढलेली ऊठबस ही आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या पथ्यावर पडणार आहे. सेनेत मागील काळात झालेल्या गळतीचा तटकरेंनी योग्य लाभ उठविलेला आहे.