सोनेरी, चंदेरी पदकाच्या प्रकाशाने चमकला रायगड; 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेल्या ट्रॉफी छत्रपतींच्या चरणी
By राजेश भोस्तेकर | Published: October 22, 2022 06:49 PM2022-10-22T18:49:13+5:302022-10-22T18:51:01+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून सोनं लुटलं आणि ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी कष्टाने सर्वाधिक पदके लुटली.
अलिबाग - जिद्द आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील गुणवंत युवा खेळाडूंनी सोनेरी यश संपादन केले. १४० विक्रमी पदकांची कमाई करत महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. यादरम्यान मिळालेल्या बहुमानाच्या ट्रॉफीला घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने धनतेरसच्या दिवशी रायगड किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा घातला. युवा खेळाडूंच्या सोनेरी आणि चंदेरी यशाच्या या ट्रॉफीने किल्ले रायगडचा परिसर उजळून निघाला. ऑलम्पिक संघटनेने धनतेरसच्या दिवशी असा वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून सोनं लुटलं आणि ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी कष्टाने सर्वाधिक पदके लुटली. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आपल्या खेळाडूंनी हे चषकरुपी धन शिवरायांच्या चरणी अर्पण करून खऱ्या अर्थाने मानवंदना दिली.
युवा खेळाडूंचे यश बहुमोल - शिरगावकर
अथक परिश्रम आणि प्रचंड जिद्दीच्या बळावर ग्रामीण भागातील युवा खेळाडूंनी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. सामन्या गणिक आपली चुणूक दाखवत खेळाडूंनी पदकावर नाव कोरले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला ऐतिहासिक असे उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला. गुजरातच्या मैदानावर महाराष्ट्र संघाचा हा गौरव खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंसाठी बहुमोल ठरला आहे. पदकासाठी त्यांनी दिलेली झुंज ही राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितपणे प्रेरणा देणारी आहे. याच पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीचे मोल जाणून आम्ही शिवरायांना चषकाच्या माध्यमातून मानवंदना दिली, अशा शब्दात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.
आपले खेळाडू हे देशात राज्याचे आणि जगात देशाचे नावलौकिक वाढवीत असतात. आजच्या या यशाने राज्यातल्या तमाम खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे. पुढल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रच अव्वल स्थानी असेल, ही खात्री आहे, असे शब्दात पथक प्रमुख प्रदीप गंधे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख प्रदीप गंधे,निलेश जगताप, अमित गायकवाड, राजेंद्र घुले, शिवाजी साळुंखे, संदीप वांदळे, क्रीडा अधिकारी रायगड, शिवाजी कोळी- कुस्ती मार्गदर्शक व पदक विजेते खेळाडू यावेळी उपस्थित होते.