लोकमत न्यूज नेटवर्क दासगाव : किल्ले रायगडावर एक हजार आठ वेळा जाण्याचा संकल्प करून रायगड परिसर आणि किल्ले रायगडाच्या विविध भागाची खडानखडा माहिती गोळा करण्याचे काम करणारे सुरेश वाडकर यांनी शुक्रवारी अल्प आजाराने मुंबई येथे उपचार घेत असतानाच अखेरचा श्वास घेतला.
किल्ले रायगड परिसरातील कोंझर हे त्यांचे जन्म गाव. मुंबई येथील कलरकेम कंपनीत काम करत असतानाच, त्यांची रायगड किल्ल्याशी मैत्री जडली. १९६७ पासून रायगड भ्रमंती आणि १९९० पासून त्यांनी डोंबिवली ते रायगड पायी प्रवास करत, किल्ले रायगड १,००८ वेळ सर करण्याचा संकल्प केला. आजवर त्यांनी ९९८ अभ्यासपूर्ण भेटी सफल केल्या आहेत. आपल्या रायगड भेटीत गेली ४० वर्षांत त्यांनी रायगड किल्ल्याचा परिपूर्ण अभ्यास करत, येथील वनस्पती, विषारी–बिनविषारी सर्प, पक्षी आदी घटकांचा अभ्यास केला. रायगडावर आढळणाऱ्या पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढत, त्यांनी पक्ष्यांशीही मैत्री केली होती. आजवर त्यांनी सुमारे ४ लाख ५० हजार शिवप्रेमींना रायगड दर्शन घडविले आहे. महाराष्ट्रातील अपंग, अंध, मूकबधिर विद्यार्थ्यांना रायगड दाखविण्याचे काम सुरेश वाडकर यांनी केले आहे. ‘रायगड परिसर आणि निसर्ग’ या विषयावर आजपर्यंत जवळपास १,४७६ व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी देखील त्यांचा निकटचा संबंध होता. बाबासाहेब पुरंदरे यांना वाडकर गुरुस्थानी मानत होते.
गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. उपचारानंतर ते पुन्हा सक्रिय झाले होते. दोन दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने पुन्हा मुंबई येथे नेण्यात आले आणि त्या ठिकाणीच त्यांची प्राणज्योत मालवली.
रायगड दर्शन घडविलेसुरेश वाडकर यांना आजवर विक्रोळी येथील शौर्य पुरस्कार, परळ मधून अष्टगंध, डोंबिवली येथून चतुरंग, कोकणातून कोकणरत्न, आदी पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, हवाई दल प्रमुख अनिल चिटणीस, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनोहर देशमुख, राज्यपाल सी.विद्यासागर राव, मानसिंगराव पवार आदि अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी सुरेश वाडकर यांच्यासह रायगड दर्शन केले आहे.