रायगडचे किल्लेदार पारंपरिक, नवे की बंडखोर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 05:13 AM2019-10-18T05:13:58+5:302019-10-18T05:14:25+5:30
उरणमधील बंडाळीकडे सर्वाधिक लक्ष : चार उमेदवार हॅट्ट्रिकच्या तयारीत, काँग्रेसपुढे भोपळा फोडण्याचे आव्हान
बंडखोरांची संख्या वाढल्याने यंदा रायगडच्या लढाईत ठिकठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. तेथे दोन जागा राखताना एक जादा आमदार निवडून आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष प्रयत्नशील आहे. भाजपने दोन उमेदवारांना विधानसभेत पाठवण्यासाठी कंबर कसली आहे.
शिवसेना दोनाचे तीन आमदार व्हावे, या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या दोन्ही जागा राखण्याच्या धडपडीत आहे, तर काँग्रेसला मात्र भोपळा फोडावा लागणार आहे. युतीत अलिबाग, श्रीवर्धन, महाड, कर्जत, उरण मतदारसंघात शिवसेना, पनवेल आणि पेणमध्ये भाजप लढते आहे. आघाडीमुळे अलिबाग, पेण, पनवेल, उरणमध्ये शेकाप, कर्जत आणि श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, रिंगणात आहेत. महाडची जागा लढवतानाच काँग्रेस अलिबाग आणि पेणमध्ये मैत्रीपूर्ण लढतीत आहे.
उरणमध्ये भाजपचे महेश बालदी यांनी शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्याविरोधात थोपटलेले दंड सर्वाधिक चर्चेत आहेत. अलिबागमध्ये काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसच्याच अॅड. श्रद्धा ठाकूर यांना आव्हान दिले आहे. तेथे दीर-भावजयीत सामना आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याविरोधात काँग्रेसचे ज्ञानदेव पवार, दानिश लांबे आणि मोईझ शेख यांनी बंडाचा झेंडा फडकावला
आहे.
युतीतील बेबनाव, मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली आघाडीतील संघर्ष, शेकापपुढे गड राखण्याचे आव्हान यामुळे जिल्ह्याचे किल्लेदार पारंपरिक असतील, की नवे याकडे लक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी गेले काही दिवस ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चा राग आळवत मैत्रीपर्व वाढवले. त्याचा परिणाम लोकसभेत दिसला. आताही दोन्ही पक्षांनी सध्याच्या चार जागा राखण्यासाठी आधीपासून तयारी केली आहे. पनवेलमध्ये रामशेठ आणि प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून भाजपने जिल्ह्यात पाय रोवले. आता पेणमध्ये विस्तारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुद्दाम वेळ काढत पेणमध्ये सभाही घेतली. तेथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची फिल्डिंग कशी कामी येते ते महत्वाचे.
प्रचारातील प्रमुख मुद्दे
१राज्याला दोन मुख्यमंत्री देणारा जिल्हा असूनही पायाभूत सुविधांचा अभाव. पण त्यातून परस्परांवर फक्त आरोप. घराणेशाहीचा मुद्दाही प्रचारात.
२ मुंबईपासून जवळ असल्याने अनेक प्रकल्पांनी ग्रासलेला आणि त्या प्रश्नांतून पोळलेला जिल्हा.
३नाणारमधून येणारा तेलशुध्दिकरण प्रकल्प किंवा नवनगर हा नवा प्रकल्प सध्या चर्चेत.
४ भाताचे कोठार अशी असलेली ओळख पुसून सध्या प्रकल्प, उधाणामुळे नष्ट होणारी शेती ही ओळख.
रंगतदार लढती
श्रीवर्धन मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती प्रथमच विधानसभेच्या रिंगणात आहेत. राजकारणात कसलेले शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्याशी त्यांचा सामना आहे. अंतर्गत वादामुळे त्यांचे चुलत भाऊ अवधूत सेनेसोबत आहेत.
पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, पेण मतदारसंघात शेकापचे धैर्यशील पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश लाड हे उमेदवार हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या लढतींकडे लक्ष लागले आहे.
पनवेलनंतर पेणमध्ये विजय मिळवून कोकणातील ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याने मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. त्याला शेकाप कशी टक्कर देतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
उरण मतदारसंघात भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करून शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. याचा फायदा शेकापचे विवेक पाटील उचलतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.