रायगडमध्ये घरोघरी उत्साहात झाले गौरींचे पूजन; महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:27 PM2020-08-26T23:27:26+5:302020-08-26T23:27:40+5:30
जिल्ह्याभरात १४ हजार ४२३ गौरींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
अलिबाग : गणरायाच्या आगमनानंतर रायगडात मोठ्या उत्साहाने बुधवारी गौरार्इंचे घरोघरी स्वागत करून पूजन करण्यात आले आहे. गौरी आगमनामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विघ्नहर्त्या गणरायाची माता असणाऱ्या पार्वतीचे, सोनपावलाने ज्येष्ठा गौरी म्हणून मनोभावे पूजन केले गेले. जिल्हाभरात १४ हजार ४२३ गौरींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, सुवासिनींच्या हस्ते पूजन झाले आहे. गौरीच्या आगमनामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोकणात परंपरेनुसार माळरानावरून तेरड्याच्या गौरींचे घरोघरी वाजतगाजत आगमन झाले. त्यानंतर, गौरी सजविण्यात आल्या. वस्त्रालंकारांचा साजश्रृंगार चढविण्यात आला. भेंडीच्या फुलांनी पूजा करण्यात आली. महिलांनी गौराईची सामूहिक आरती केली. तिला आवडणाºया भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. जेवणानंतर गौरीचे स्तवन झाले. महिलांची नाचगाणी, फुगड्या आदी खेळांना रंगत आली. गौरींच्या आगमनामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, गौरीच्या सणासाठी महिला मोठ्या संख्येने माहेरी आल्या आहेत. बुधवारी गौरीपूजन, तसेच तिखटाचा सण केला गेला. महिलांनी नाचगाणी फुगड्या खेळून रंगत आणली, तर काही ठिकाणी गौरींसाठी सोशल डिस्टंन्सचे पालन करून भजन कीर्तनासह इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
पौराणिक गीतांवर नृत्य करण्याची प्रथा
माहेरी आलेल्या गौरीला निरोप देताना पौराणिक आख्यान गीतांवर नृत्य करण्याची प्रथा शतकानुशतके सुरू आहे. ग्रामदेवतेच्या पुढे गौरीची प्रतिमा डोक्यावर घेऊन पुरुष गौरीकथा आणि महात्म्य उपस्थितांपुढे मांडतात आणि नंतरच नदीत तिचे विसर्जन केले जाते. ही शतकोनुशतके परंपरा अव्याहत सुरू होती. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा आता खंडित झाली आहे. येथील शेतकऱ्यांची अशी धारणा आहे की, गौर त्यांच्या घरी येते ती माहेरपणासाठी. तिला आवडीचे पदार्थ दिले जातात. तिचे पूजन-अर्चन वंशवाढीसाठी आवश्यक असते, तसेच गौरीचे वर्णन कृषी संस्कृतीच्या विलोभनीय गीतांमधून केले जाते. हा उत्साह न्याराच आसतो.
कुंतीने हे व्रत केल्याचेही या गीतांमधून सांगितले जाते. भेंडीच्या झाडांना फुले येतात, नद्या भरून वाहत असतात, तेव्हा गौरीचे आगमन होते, असे वर्णनही यावेळी गायलेल्या गीतांमधून व्यक्त होते. गौराईचा सण महिलांसाठी विशेष असतो. या वेळी माहेरपणाला आलेल्या गौराईचे सारे लाड पूरवले जातात. हि परंपरा फार जूनी आहे.