रायगडात प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By admin | Published: February 20, 2017 06:27 AM2017-02-20T06:27:23+5:302017-02-20T06:27:23+5:30
रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. गेल्या सहा दिवसांपासून
आविष्कार देसाई / अलिबाग
रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. गेल्या सहा दिवसांपासून विविध राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत रायगडच्या राजकारणाचे रणांगण चांगलेच तापवले होते. छुप्या प्रचारावर भर देऊन मतदारराजापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात कोट्यधीश उमेदवारांची कमतरता नाही. याच कालावधीत मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसा, विविध वस्तूंचे प्रलोभन दाखविण्यात येणार असल्याच्या शक्यतेने निवडणूक विभागाने आपले लक्ष त्याकडे केंद्रित केले आहे.
जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३७४ असे एकूण ५५७ उमेदवार आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये जुन्या-नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षांनी गेले सहा दिवस प्रचाराचा धुरळा उडवून दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी आपापल्या वरिष्ठ नेत्यांना रणांगणात उतरवले होते. जिल्हा परिषदेवर आपलीच सत्ता यावी यासाठी कोणताही एकच पक्ष सक्षम नसल्यानेच त्यांनी सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केलेले नाहीत. शिवसेनेने ४५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. जिल्ह्यात कमकुवत असणाऱ्या भाजपाने तब्बल ३९ उमेदवारांची फौज रणांगणात उतरवली आहे. शेकापने ३७, राष्ट्रवादी काँग्रेस २४ आणि काँग्रेसने २० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
युती अथवा आघाडीच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या संख्याबळावर सत्ता स्थापनेची गणिते अवलंबून आहेत. दोन राजकीय पक्षांच्या निवडून येणाऱ्या जागा अधिक अन्य एका पक्षाची मदत घेण्याची वेळ कदाचित येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन राजकीय पक्षांकडे सत्तेच्या बेरजेचे संख्याबळ घुटमळणार असल्याने दोन राजकीय पक्षांना शिवतीर्थावर सत्तास्थापनेचा दावा करणे शक्य नसल्याचे सध्यातरी दिसून येते. शेकाप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता आहे, तर शिवसेनेने काँग्रेस, भाजपा यांच्या हातात हात घातला आहे. त्यामुळे शेकाप-राष्ट्रवादीला संख्याबळ कमी पडल्यास शिवसेना मदत करणार नाही, तर अन्य एका राजकीय पक्षाची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. तो अन्य पक्ष काँग्रेस असण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला सत्तेचे समीकरण जुळवून आणायचे असल्यास त्यांना शेकाप आणि राष्ट्रवादीत फूट पाडावी लागेल, परंतु शेकाप आणि राष्ट्रवादी यांची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने तसे काही होईल असे वाटत नसले, तरी राजकारणात नेहमी नवीन घडत असते, एवढे मात्र खरे आहे.
जिल्ह्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त
1अलिबाग : मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरिता तर जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या एकूण ११८ जागांकरिता होणारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
2सराईत गुन्हेगार, सार्वजनिक शांतता भंग आणि समाजविघातक कृत्ये केल्याचा पूर्वइतिहास अत्यंत काळजीपूर्वक तपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानपूर्व बंदोबस्ताचा महत्त्वाचा भाग म्हणून तब्बल १ हजार ७६० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.
3प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत फौजदारी दंड प्रक्रि या संहिता कलम १४४(१)व (३) अन्वये ७० जणांवर कारवाई करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार करण्यात आले आहेत. फौजदारी दंड प्रक्रि या संहिता कलम १०७ अन्वये १ हजार ९३ जणांवर तर फौजदारी दंड प्रक्रि या संहिता कलम १०९,११०,१५१,१५१(१) अन्वये १९६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात शांतता भंग करू नये याकरिता ४०१ जणांना फौजदारी दंड प्रक्रि या संहिता कलम १४९ अन्वये तंबी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
4रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या बंदोबस्ताकरिता जिल्ह्यातील व बाहेरील एकूण १७३ पोलीस अधिकारी, १ हजार ८९३ पोलीस कर्मचारी, १७ दंगल नियंत्रण पथके, २० शीघ्र प्रतिसाद पथके, ५५० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी , १३७ बिनतारी संदेश यंत्रणायुक्त वाहने, असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
5या नियुक्त पोलीस बंदोबस्ता तील अधिकारी व कर्मचारी हे मतदान केंद्र, मतदान विभाग, झोन पेट्रोलिंगकरिता तसेच जिल्ह्यात मतदानाच्या वेळी काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास अपर पोलीस अधीक्षक व नियंत्रण कक्ष यांच्या अधिपत्याखाली विशेष पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.
९९ दारूबंदी गुन्हे दाखल
रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशी-विदेशी व गावठी दारू निर्मिती व विक्र ी करणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यांतर्गत आतापर्यंत ९९ गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून २५ लाख २६ हजार ७५६ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नागरिकांकरिता
तत्काळ हेल्पलाइन
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये व निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता रायगड पोलीस दल सज्ज आहे. पोलिसांनी त्यासाठी तयारीला ही सुरु वात
के ली आहे.रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कोणतीही समस्या अथवा प्रश्न उद्भवल्यास मतदार वा नागरिकांनी तत्काळ रायगड पोलीस नियंत्रण कक्ष हेल्पलाइन ०२१४१-२२८४७३, मोबाइल- ७०५७६७२२२६, ७०५७६७२२२७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे. निवडणूक काळात मतदार आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही अनिल पारसकर यांनी सांगितले आहे.