नवी मुंबईसह रायगडला फटका; वीजपुरवठा खंडित झाल्याने कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:06 AM2020-10-13T01:06:23+5:302020-10-13T01:06:34+5:30
रायगड जिल्ह्यात तीन तास बत्ती गुल; नागरिक हैराण
रायगड : महापारेषणच्या इतिहासामध्ये प्रथमच वीज पुरवठा खंडीत झाला. रायगड जिल्ह्यात सुमारे तीन तास वीज गायब झाली होती. २४० मेगावॉट वीजेच्या तुडवड्याने तब्बल तीन लाख ४५ हजार वीज ग्राहक प्रभावीत झाले होते.त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मुंबई, ठाणे, नवीमुंबईमध्येही वीज पुरवठा खंडीत झाला होता.
विविध सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जनरेटच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरु राहील्याने या ठिकाणी विशेष अडचण आली नाही. मात्र, जिल्ह्यातील अन्य ग्राहकांना त्यांचा चांगलाच त्रास झाला. महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट-१ मध्ये देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे त्याचा अतिरीक्त भार हा सर्किट -२ वर होता. मात्र सर्किट -२ मध्ये अचानक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. अचानक वीज गायब झाल्याने सुरुवातीला काहीच कळले नाही. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील फोन खणखणत होते. वीज का गेली आहे याबाबतचा संदेश संबंधीत कंपनीने ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवल्यावर खरे कारण समजू शकले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी वीज पुरवठा सुरु झाला.
विजेच्या लपंडावामुळे नवी मुंबईकर हैराण
दिवसभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नवी मुंबईकर ही हैराण झाले. अचानक वीज गेल्यामुळे रूग्णांचीही गैरसोय झाली. बेलापूर परिसरात पहाटे तीन ते सायंकाळपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता.
सीबीडी, बेलापूर परिसरात पहाटे तीन वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला. नागरिक व लोकप्रतिनिधींनी वारंवार महावितरण कार्यालय व अधिकारी, कर्मचा-यांशी संपर्क केल्यानंतर ही व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. पहाटे सात वाजता वीज आली. पुन्हा साडेदहा च्या दरम्यान ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. अचानक वीज गेल्यामुळे रूग्णांचीही गैरसोय झाली. एक्स रे व इतर तपासण्या वेळेत करता आल्या नाहीत. घरीच उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णांचे प्रचंड हाल झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. बेलापूर सेक्टर २० व इतर ठिकाणी दुपारी तीन वाजता पुन्हा वीज गेली. सायंकाळी साडेसातवाजता वीज आली. नागरिकांनी महावितरण शी संपर्क साधल्यावरही योग्य माहिती मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.