रायगड हॉस्पिटलला कोविड रुग्णालयाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 11:49 PM2021-04-21T23:49:24+5:302021-04-21T23:49:34+5:30
आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल २१ एप्रिलपासून कोविड रुग्णालय म्हणून सुरू केले आहे, आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.
१७ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती कशी आहे याबाबत विचार विनिमय करण्यात आला. यात प्रामुख्याने कर्जतमध्ये कोविड रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, असे मत आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडले व जम्बो कोविड रुग्णालयाची मागणी केली. परंतु जोपर्यंत जम्बो कोविड रुग्णालय होत नाही तोपर्यंत रायगड हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी केली.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून व पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज रायगड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णालय चालू करण्यात आले आहे, त्यामुळे याचा फायदा नक्कीच पुढील काळात नागरिकांना होईल, असे सांगितले. यावेळी रायगड हॉस्पिटल चेअरमन डॉ. नंदकुमार तासगावकर, डॉ पाणिनी, सुनील गोगटे, राजेश भगत, नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते.