कर्जत : रायगड हॉस्पिटल कोविड सेंटर की धर्मशाळा, असा प्रश्न रायगड हॉस्पिटलमधील परिस्थिती बघून राष्ट्रवादीचे नेते उदय पाटील यांनी उपस्थित केला आहे.
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलला कोविड सेंटर म्हणून शासनाने मान्यता दिली. याचे श्रेय घेण्याबाबत लोकप्रतिनिधींची अहमहमिका लागली. विविध वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर याबाबत प्रसिद्धी दिली गेली. आपल्या तालुक्यात शंभर बेडचे रुग्णालय कोरोना बाधितांसाठी उपलब्ध झाल्याने कुठेतरी आशेचा किरण दिसू लागला, परंतु हे हॉस्पिटल म्हणजे फक्त निवारा केंद्र आहे, असेच वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया उदय पाटील यांनी दिली.
माझ्या भावाला आणि त्याच्या मुलाला ताप आल्याने कशेळे ग्रामीण रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सरकारी रु ग्णवाहिकेने रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयाच्या वॉचमेनने त्यांना त्यांच्या बेडपर्यंत आणून सोडले. इतकेच काम दवाखान्यामार्फत केले गेले. दाखल करून चोवीस तास उलटून गेले, परंतु नर्स किंवा डॉक्टर यांपैकी कोणीही तेथे फिरकलाही नाही. सलाइन औषधे तर नाहीच, पण काय काळजी घ्यायची किंवा कोणते काढे, औषधे घ्यायची, याबाबत सूचना द्यायलाही कोणी आले नाही.
जेवण आणि नाष्टा पुरविला जातो, ही एक त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. येथील परिस्थितीवरून हे रुग्णालय म्हणजे धर्मशाळा आहे, असेच वाटते. रुग्णाबाबत होणाऱ्या हलगर्जीबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स असाव्यात आणि असतील, तर त्यापैकी कोणीतरी किमान चोवीस तासांतून एकदा तरी रुग्णांकडे बघावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.