बाहेरून येणाऱ्या कंपन्यांचे रायगड बनतेय आगार - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 02:05 AM2019-06-29T02:05:04+5:302019-06-29T02:05:09+5:30
सध्याच्या घडीला रायगड बाहेरच्या कंपन्यांचे आगार बनत चालले आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पनवेल - रत्नागिरी येथून नाकारलेले नाणार आता रायगडमध्ये येऊ घातले आहे. एकेकाळी रायगड हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. मात्र, ही ओळख आता पुसू लागली आहे. सध्याच्या घडीला रायगड बाहेरच्या कंपन्यांचे आगार बनत चालले आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शुक्रवारी खारघर येथे आयोजित रयत सेंटेनरी सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अॅण्ड इनक्युबेशन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी शरद पवार बोलत होते. काळानुरूप बदलाची नोंद करून रयत शिक्षण संस्था पुढे वाटचाल करीत आहे. ‘कमवा आणि शिका’ या ब्रीदवाक्याप्रमाणे नवीन पिढीला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रयत प्रोत्साहन देत आहे. या शिक्षण संस्थेमार्फत नवीन उद्योजक व व्यावसायिक घडविण्याचे काम सुरू असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्था ही नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे प्रयत्न करीत असते. रयतच्या या उपक्रमाला टाटा कन्सल्टन्सीने मोलाची साथ दिली. टाटा कन्सल्टन्सीने या ठिकाणी सुमारे ४० कोटींची मदत केली आहे. रशिया, कोरिया सारख्या कंपन्या आज भारतात येत आहेत. या केंद्रात शिक्षण घेतलेले विद्यार्थी उद्योजक स्वत:च्या पायावर उभे राहणार आहेत. तसेच स्थानिकांनादेखील याचा मोठा फायदा होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी पार्क चे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनीही या वेळी या केंद्राचा वापर कशाप्रकारे होणार आहे, याची माहिती देत लघु सूक्ष्म उद्योगधंद्यामध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांना त्यांच्या प्रोडक्ट्वर संशोधन करण्याची संधी या केंद्रात मिळणार आहे, हे केंद्र उभारणीसाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मोठी आर्थिक मदत केली आहे. दरवर्षी या केंद्रांतून विशेष गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रामशेठ ठाकूर हे स्कॉलरशिप देणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील यांनी, सध्याच्या घडीला साडेचार लाख विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
या वेळी शरद पवार यांनी केंद्राची माहिती घेतली. रयत सेंटेनरी सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अॅण्ड इनक्युबेशन केंद्राची पाहणी केली. या वेळी एन. डी. पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्री चौगुले, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील आदीसह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.