- मधुकर ठाकूर उरण -मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरुळ ते उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत सोमवारी (१६) सायंकाळी रेल्वेच्या विद्युत वाहनाने मार्गावरील विद्युत यंत्रणा तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रेल्वे मार्गावरील सुरू करण्यात आलेल्या या वीज वाहिन्यांच्या तपासणीच्या कामामुळे या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले आहेत. स्टेशन उभारणी, रेल्वे ट्रॅक टाकणे, ओव्हरहेड वायर, तिकीट घर, उड्डाण पूल उभारण्याची कामे प्रगतीपथावर असून वेगाने सुरू आहेत.या प्रगतीपथावरील कामांच्या जोरावरच रेल्वे प्रशासनाने मागील दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करून या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या तीन डेडलाईन जाहीर करण्यात आल्या होत्या.दिलेली डेडलाईन्स पुन्हा हुकणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानेही या रेल्वे मार्गावर शिल्लक राहिलेली विविध कामे युद्ध पातळीवर सुरू केली आहेत.या रेल्वे मार्गावर सुरक्षा ट्रायलरनची चाचणीही घेण्याबरोबरच इतर तपासण्या आदी तत्सम कामांचे टार्गेटही पुर्ण करण्यासाठीही प्रशासनाने कंबर कसली होती.मात्र त्यानंतरही वारंवार दिलेल्या हेडलाईन्स पाळण्यात रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
पावसाळ्यानंतर सोमवारी (१६) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रेल्वेच्या विद्युत वाहनाव्दारे खारकोपर पासून गव्हाण,रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी व उरण या मार्गावरील वीज वाहिन्यांच्या तपासणीच्या कामाला रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे.रेल्वे मार्गावरील सुरू करण्यात आलेल्या या वीज वाहिन्यांच्या तपासणीच्या कामामुळे या मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
याबाबत कर्मचाऱ्यांकडे केलेल्या चौकशीत ही रुटिंग तपासणी असून प्रवासी वाहतूक सुरू करण्याआधीही अशाच प्रकारची तपासणी करण्यात येईल अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.तर अपुरी असलेली काही कामे अद्यापही पुर्णत्वास गेलेली नाहीत.या कामासाठी होणारा विलंबच खारकोपर ,गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील प्रवासी वाहतूक सुरू करण्यात अडथळा ठरत आहे. रेल्वे मार्गावर शक्य तितक्या लवकर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.त्यामुळे या रखडलेल्या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आणखी किती काळावधी जाईल हे निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे मध्यरेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.