इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत १६ मृत्यू; डोंगरावरच मृतदेह दफन करण्याचं काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:15 AM2023-07-21T08:15:58+5:302023-07-21T08:16:43+5:30

घटनास्थळी पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने कुठलीही मशिनरी तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अपुऱ्या साहित्यामुळे मलबा बाजूला सारणे मोठे आव्हानात्मक झाले आहे.

Raigad Irshalwadi Landslide: 16 dead in Irshalwadi tragedy so far; The work of burying the bodies on the mountain itself is going on | इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत १६ मृत्यू; डोंगरावरच मृतदेह दफन करण्याचं काम सुरू

इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत १६ मृत्यू; डोंगरावरच मृतदेह दफन करण्याचं काम सुरू

googlenewsNext

रायगड – खालापूरनजीक इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याने अख्खं गाव जमीनदोस्त झाले. याठिकाणी ढिगाऱ्याखाली बरेच लोक गाडले गेले. बुधवारी मध्यरात्रीपासून इर्शाळवाडीत शोधमोहिम सुरू आहे. NDRF पथके आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील जखमींवर नवी मुंबई इथं उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी पोहचण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने तासभर पायपीट करावी लागते. याठिकाणी जवळपास १०-१५ फूट मातीचा थर असल्याने बचाव पथकाला अडथळे येत आहेत.

घटनास्थळी पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने कुठलीही मशिनरी तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अपुऱ्या साहित्यामुळे मलबा बाजूला सारणे मोठे आव्हानात्मक झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा भूस्खलन होऊ नये यासाठी शोधकार्य थांबवले होते. आज पुन्हा सकाळी एनडीआरएफचे पथक आणि कर्मचारी घटनास्थळी शोधमोहिम सुरू करणार आहेत. २ दिवस उलटल्याने आता ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत असण्याची आशा मावळली आहे. याठिकाणी मृतदेह बाहेर काढून तिथेच बाजूला खड्डा खणून त्यात दफन केले जात आहे. अद्यापही ६० हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली असल्याचा संशय आहे. आजचा दिवस शोधकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

इर्शाळवाडीतील लोक स्थलांतरीत होणार होते, पण...

कोकणात पडणारा मुसळधार पाऊस आणि डोंगराच्या पायथ्याशी असलेलं गाव ही सगळीच धोकादायक स्थिती असल्याने ग्रामस्थांना तिथून स्थलांतरीत होण्यास सांगितले होते. नवीन जागेसाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव करूया. आमच्याच गावात शंभर एकर परिसर आहे. तिथे इर्शाळवाडी ग्रामस्थांसाठी नवीन घरे बांधण्याचा प्रस्ताव होता परंतु त्याआधीच असे काही विपरीत घडेल याची कल्पना तिथल्या कुणाही ग्रामस्थांना नव्हती अशी माहिती सरपंच रितू ठोंबरे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद

ही दुर्घटना घडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले होते. सकाळपासून त्यांनी याठिकाणी आढावा घेतला. तासभर पायपीट करत स्वत: दुर्घटनास्थळी पोहचले. तिथल्या पीडित कुटुंबांची विचारपूस केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांना मदतीचे आवाहन केले होते त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांबरोबरच मदतकार्यासाठी तैनात मनुष्यबळासाठी अन्नाची पाकिटे, चादरी-ब्लॅंकेटस, तात्पुरते निवारे, कंटेनर, पाण्याच्या बाटल्या, टॉर्च, बिस्किटे तसेच प्रथमोपचार साहित्य आदी मदत साहित्याचा ओघ सुरु झाला आहे. २० बाय १० आकाराचे ४, ४० बाय १० आकाराचे २ आणि इतर दोन असे ६ कंटेनर उरण, जेएनपीटी, रत्नागिरी एमआयडीसी आणि जेएसडब्ल्यू समूहाकडून घटनास्थळावरील बेसकॅम्पकडे रवाना झाले आहेत. चौक, खालापूर येथे तात्पुरती निवाराव्यवस्था प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तीन हजार अन्नाची पाकिटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. घटनास्थळ उंचीवर असल्याने यंत्रसामुग्री पोहोचत नसल्याने मातीचे ढिगारे दूर करण्यासाठी पनवेल येथून ८० अनुभवी कारागीरांचे पथक अवजारांसह घटनास्थळी पोहोचले आहे.

Web Title: Raigad Irshalwadi Landslide: 16 dead in Irshalwadi tragedy so far; The work of burying the bodies on the mountain itself is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.