रायगड – बुधवारी रात्री खालापूरनजीक इर्शाळगड येथे दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास ४०-५० घरे मातीखाली गाडली गेली. याठिकाणी १०० हून अधिक नागरिक बेपत्ता झाले. आतापर्यंत ९० हून नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले. तर १६ लोक दगावल्याची माहिती आहे. या दुर्घटनेतील जखमींना नवी मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुसळधार पाऊस आणि दुर्गम वस्ती असल्याने येथे शोधकार्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गडाच्या पायथ्यापासून इर्शाळगडावर पोहचायला जवळपास एक ते दीड तास पायपीट करावी लागते. या भागात कुठलीही मशिनरी पोहचत नाही. तसेच नेटवर्कचीही सुविधा नाही. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचण येत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनानंतर इथं अनेक स्वंयसेवी संस्था पुढे आल्या आहेत. त्यातील एक रिलायन्स फाऊंडेशन आहे. रिलायन्स फाऊंडेशनकडून गडाच्या पायथ्याशी हॅम रेडिओ सेटअप ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.
ही यंत्रणा काम कशी करते?
घटनास्थळी नेटवर्कची समस्या होत असल्याने पायथ्याशी असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला माहिती मिळण्यास विलंब व्हायचा. परंतु रिलायन्स फाऊंडेशनने हॅम रेडिओ सेटअप उभारून ही समस्या दूर केली आहे. या यंत्रणेचे संचालक जयप्रकाश म्हणाले की, वायरलेस कंट्रोलच्या माध्यमातून पायथ्याला एँटिना उभा करण्यात आला आहे. आमच्या टीममधील १२ जण एकमेकांच्या संपर्कात आहेत. घटनास्थळावरून जी काही माहिती उपलब्ध होईल ती प्रशासनाला पोहचवली जात आहे. घटनास्थळावरून इमरजेन्सी मेसेज आला तर फोनची आवश्यकता नाही. रेडिओच्या माध्यमातून ही माहिती आमच्याकडे उपलब्ध होते. आमच्यासोबत डॉक्टरांची टीम आहे. इर्शाळवाडी ते पायथ्यापर्यंत एकूण ५ सेटअप उभारण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले.
मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने हवे तसे संवाद होत नसल्याने हॅम रेडिओच्या माध्यमातून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यातून दुर्घटनास्थळाहून एखादा मेसेज पोहचवला गेला तर तो सेंटरला पोहचेल. त्याठिकाणी कर्मचारी हा मेसेज लिहून तो प्रशासकीय यंत्रणेला देतील. त्यामुळे गरज, आवश्यकतेनुसार पुढील प्रशासकीय निर्णय घेतले जातील अशी ही यंत्रणा काम करतेय.