Irshalwadi Landslide : "डोंगर वरुन खचत होता, आम्ही मातीतून कसे तरी बाहेर पडलो आणि जीव वाचवण्यासाठी खाली पळालो"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:36 AM2023-07-20T11:36:50+5:302023-07-20T11:53:43+5:30
Raigad Irshalwadi Landslide Incident : इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील ४०-५० घरांवर ही दरड कोसळली आहे.
कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. याठिकाणी २५० लोकांची वस्ती असून त्यातील १०० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील ४०-५० घरांवर ही दरड कोसळली आहे. सध्या घटनास्थळी शोधकार्य सुरू आहे. इर्शाळगडावर पायथ्याशी, मध्याशी आणि उंचावर अशा तीन वस्त्या आहेत. सर्वात उंचावर असलेल्या वस्तीवर ही दरड कोसळली आहे.
पाऊस सुरू असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. याच दरम्यान रात्री नेमकं काय घडलं ते या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांनी सांगितलं आहे. "आम्ही घरामध्ये झोपलो होतो. आठ जण घरात होतो. डोंगर वरुन खचत होता, आम्ही त्याखाली दबले गेलो. आम्ही मातीतून कसे तरी बाहेर पडलो आणि जीव वाचवण्यासाठी खाली पळालो. गावात शाळा आहे. त्या शाळेत जी मुलं झोपायला गेलेली ती वाचली आहेत. आता घरच राहिलं नाही. सगळं सपाट झालं. रात्री खूप पाऊस पडत होता. वारा सुटलेला" अशी माहिती दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांनी दिली आहे.
खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेतला आहे. "प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल."
"सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. बचाव कार्यास प्राधान्य देताना युद्ध पातळीवर मदत कार्य करण्यात येईल, आदिवासी पाड्यावरील दरड कोसळलेली घटना वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इर्शाळगड ठाकूरवाडी याठिकाणी रात्रीपासून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य व मदतीचा ओघ चालू झाला आहे. प्रशासनाच्या वतीने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रात्रीच दुर्घटनाग्रस्त ठिकाणी मदत साहित्य व पथके पाठवून कार्य सुरू मदत सुरुवात करण्यात आले. दुर्घटनाग्रस्त स्थळी विविध शासकीय अधिकारी,पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, घटना स्थळी पोहचून मदत कार्य करण्यात येत आहे.