'आई, बाबा नाही आले, आम्ही शाळेत झोपलो होतो'; दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:56 AM2023-07-20T10:56:03+5:302023-07-20T10:58:08+5:30
रात्री ११ वाजताच्या आसपास दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड- खालापूर जवळ असणाऱ्या इर्शाळवाडीवर रात्री दु:खाचा डोंगर कोसळला. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे इर्शाळवाडीत दरड कोसळली. रात्रित ४०-५० घरे ढिगाऱ्याखाली गेली, या गावातील १०० हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या गावात २५० लोकांची वस्ती होती. या घटनेत बचावलेल्या एका तरुणाने रात्रिचा सर्व घटनाक्रम सांगितला.
आई, बाबा, भाऊ नाय...कोण नाय राहिला: इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांचा आक्रोश
रात्री ११ वाजताच स्थानिकांनी मदत मोहीम सुरू केली. दरम्यान, रात्रिच प्रशासनानेही मदत मोहीम सुरू केली. या घटनेनंतर सर्वत्र आक्रोश पहायला मिळत आहे. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. या गावातील काही तरुण शाळेत झोपण्यासाठी जात होते. हे तरुण बचावले आहेत.
शाळेत झोपलेले तरुण बचावले आहेत, पण त्यांचे कुटुंबिय अजूनही सापडलेले नाहीत. "आई बाबा माझे अजुनही खाली आलेले नाहीत. आम्ही त्या शाळेत झोपलो होतो तिथे दरड नाही कोसळली. माझे आई, बाबा घरी झोपले होते. त्यांना पळूनही दिले नाही. घरातील काहीच राहिलेले नाही. माझा भाऊ बाहेर हॉस्टेलला असतो. मी रात्रिच शाळेत झोपायला असतो त्यामुळे वाचलो. रात्री ११ च्या सुमारास मोठा आवाज झाला म्हणून आम्ही पळत सुटलो. तेव्हा दरड कोसळल्याचे समजले, अशी माहिती तरुणाने सांगितले.
फक्त १०-१२ घरे उरली
रात्री ११ वाजता ही घटना घडल्यानंतर जवळपासच्या गावातील तरूण मदतीसाठी धावले. रसायनी येथील काही तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. या वस्तीपर्यंत जाण्यासाठी खूप कठीण रस्ता आहे. जवळपास २ तास वरती पोहचायला लागले. आम्ही मदतीसाठी वर पोहचताना माझ्यासमोर बेलापूर येथील अग्निशमन दलातील एक कर्मचारी वाटेतच कोसळले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. याठिकाणी ५०-६० घरांची वस्ती आहे. आम्ही इथं ट्रेकला यायचो. आता याठिकाणी केवळ १०-१२ घरे उरल्याची दिसून येते. बाकी काहीच दिसत नाही असं मदतीसाठी आलेल्या तरूणांनी सांगितले.