Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 05:11 PM2023-10-16T17:11:45+5:302023-10-16T17:12:10+5:30
Raigad News: उरण परिसरात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी देवी,उरण शहरातील श्री शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील श्री एकविरा देवी आणि जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत.
- मधुकर ठाकूर
उरण - उरण परिसरात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी देवी,उरण शहरातील श्री शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील श्री एकविरा देवी आणि जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत. जागृत, भक्तांच्या हाकेला धावून येणारी, भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांना पावणारी अशी देवींची ख्याती आहे.
श्री एकविरा देवी म्हणजे अवघ्या आगरी-कोळ्याचीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे.कार्ल्यातील एकवीरा देवीच्या मंदिराप्रमाणेच उरण शहर पासून ३ किमीच्या उरण -मोरा रस्त्यावरील डोंगरातील एका पाषाणी गुहेत श्री एकविरा देवीचे मंदिर आहे.एका मोठ्या काळ्या कोरीव काम केलेले मंदिर आहे.या कोरीव मंदिरातील पाषाणातच श्री एकविरा देवी विराजमान झाली आहे. पांडवकालीन हे देवीचे स्वयंभू मंदिर असल्याचे सांगितले जात आहे.मात्र एकवीरा देवीचे स्वयंभू मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे.त्यामुळे वर्षभरात या ठिकाणी भाविकांची रेलचेल असतेच. त्याव्यतिरिक्त नवरात्रीत या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
करंजा येथील आगरी-कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री द्रोणागिरी देवीचे दुसरे प्राचीन मंदिर आहे.द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत हे मंदिर आहे.हे मंदिर साधारणपणे ३५० वर्षांपूर्वीचे आहे.अरिष्टात भक्ताला स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यानंतर सापडलेल्या देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.तीच ही श्री द्रोणागिरी देवी होय. करंजावासियांचीच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविकांची आराध्य दैवत ठरली आहे.त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटक आणि भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.नवरात्रीत भाविकांची संख्या चौपटीने वाढते.
उरण शहरातील देऊळवाडी येथील उरणावती व शितला देवीचे आणखी एक पुरातन मंदिर आहे.सुमारे २५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे.उरणावती देवीच्या नावावरुनच शहराचे नावही उरण पडले असल्याचे सांगितले जात आहे. देवीच्या मंदिरासमोरच पाषाणी दिपमाळा आहे. दर वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला देवींचा उत्सव असतो.या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात आणि दर्शनाबरोबरच यात्रेचा ही आनंद लुटतात.
उरण तालुक्यातील जसखार गावात पुरातन श्री रत्नेश्वरी देवीचे मंदिर आहे.देवी जसखार ग्रामस्थांची आराध्य दैवत आहे.जागृत देवीच्या दर्शनासाठी वर्षभरात भाविक येत असतात.सुमारे २०० वर्षापुर्वी एका भक्ताला मिळालेल्या दृष्टांतुन देवीची मूर्ती तलावात सापडली.त्यानंतर कौलारू मंदिरात रत्नेश्वरी देवीची स्थापना करण्यात आली होती.९ वर्षांपूर्वी या जुन्या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून त्या जागी पावणे चार कोटी खर्चून भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले आहे.तसेच डोंगरी येथील अंबादेवी आणि फुंडेवासियांची घुरबादेवी आदी देवीच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणावर देवीचा जागर केला जातो.
भक्तांच्या हाकेला धावून येणारी,भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांना पावणारी अशी देवींची ख्याती असलेल्या या चारही मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविकांची नवरात्रीपासुनच गर्दी उसळली आहे.