Raigad: डोंबिवलीतील कुवेत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून मारली उडी, शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:31 PM2024-07-24T20:31:50+5:302024-07-24T20:34:50+5:30
Atal Setu News: वैफल्यग्रस्त झालेल्या डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची अटलसेतुवरुन उडी मारुन बेपत्ता झाला असल्याची दूदैवी घटना मंगळवारी (२४) दुपारच्या सुमारास घडली.
- मधुकर ठाकूर
उरण - वैफल्यग्रस्त झालेल्या डोंबिवलीतील कुवैत रिटर्न इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची अटलसेतुवरुन उडी मारुन बेपत्ता झाला असल्याची दूदैवी घटना मंगळवारी (२४) दुपारच्या सुमारास घडली.श्रीनिवास कुरुकुट्टी (३८) असे या बेपत्ता इसमाचे नाव असून त्याचा समुद्रात सर्वत्र शोध सुरू असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी दिली.
डोंबिवलीतील श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत काम करीत होते.इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून काम करीत असलेल्या श्रीनिवास यांनी ऑक्टोबर २०२३ मध्येच कुवैत येथील जॉब सोडून डोंबिवलीतच आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता.मात्र व्यवसायात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे श्रीनिवास वैफल्यग्रस्त झाले होते. मंगळवारी (२४) दुपारी १२.३० वाजता नेक्सास या चारचाकी गाडीतून श्रीनिवास अटलसेतुवर आले होते.सेतुवर येताच चारचाकी पार्क करून इकडे तिकडे न पाहता थेट सेतूवरुन थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेऊन बेपत्ता झाले.याआधीही कुवैतमध्ये काम करीत असतानाही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.अशी माहिती नातेवाईकांनी दिली असल्याचे न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी सांगितले.
अटलसेतुवरुन समुद्रात उडी घेऊन बेपत्ता झालेल्या श्रीनिवास यांचा चार मच्छिमार बोटी, सागरी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने शोध सुरू आहे.मात्र खवळलेला समुद्र आणि खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.त्यामुळे शोधमोहीमेला अद्यापही यश मिळाले नसल्याची माहिती वपोनि बागवान यांनी दिली.