रायगडमध्ये लालपरी पुन्हा धावली रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:39 AM2020-05-23T00:39:48+5:302020-05-23T00:40:20+5:30
एसटी सुरू करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून या ३६ बसेस सुरू करण्यात आल्या असून, रोज ३२४ फेऱ्या होणार आहेत.
अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने २२ मार्चपासून संचारबंदी लागू केली होती. सार्वजनिक एसटी बस वाहतूकही बंद झाली होती. मात्र, आता राज्य परिवहन महामंडळाने दोन महिन्यांनंतर रेड आणि कंटेन्मेंट झोन वगळता जिल्हाअंतर्गत एसटी बस सेवा २२ मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात शुक्रवारपासून लालपरी पुन्हा एकदा रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली.
एसटी सुरू करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून या ३६ बसेस सुरू करण्यात आल्या असून, रोज ३२४ फेऱ्या होणार आहेत. २२ मार्चपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली. कोरोना हा गर्दीच्या ठिकाणी वाढण्याची शक्यता असल्याने सर्व वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्या. त्यामुळे एसटी बससेवाही बंद झाली होती. त्यामुळे कोट्यवधीचा आर्थिक फटका हा राज्य परिवहन महामंडळाला सहन करावा लागला आहे. मात्र, आता परिवहनमंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून एसटी रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. एसटी बस या निर्जंतुकीकरण करून प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ५० टक्के प्रवासी बसमध्ये घेतले जाणार आहेत. अलिबाग आगारातून प्रथम अलिबाग-पेण, अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-रोहा या एसटी बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच महत्त्वाचे असेल तरच प्रवाशांनी बसने प्रवास करा, असे आवाहनही अलिबाग आगारप्रमुख ए. व्ही. वनारसे यांनी केले आहे.
प्रवाशांचा
अल्प प्रतिसाद
अलिबाग : लॉकडाउनमुळे मिळालेल्या सक्तीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर एसटी रस्त्यावर धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या लालपरीलाही प्रवाशांनी अल्प प्रतिसाद दिला.
नियोजित फेऱ्यांपैकी केवळ ७० फेºयाच चालवण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
अलिबाग आगारातून सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास अलिबाग-पेण, मुरुड आगारातून मुरुड-अलिबाग, पेण आगारातून दुपारी पेण-पाली, अशा बसेस सोडण्यात आल्या.
अटी-शर्तीवर एसटी सुरू
सामाजिक अंतर राखून प्रवाशांनी एसटीमध्ये बसणे. ज्येष्ठ नागरिक तसेच १० वर्षांखालील मुलांना एसटी प्रवासाला बंदी करणे.
बसमध्ये बसण्यापूर्वी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणे, तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, अशा अटी शर्तीवर एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.