Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे?; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 10:53 AM2021-07-25T10:53:41+5:302021-07-25T10:55:01+5:30
दुर्घटनाग्रस्त तळीये ग्रामस्थांचा सवाल; संपूर्ण गावावर शोककळा
निखिल म्हात्रे
अलिबाग : एका क्षणात आई गेली, बाप गेला, गेली वाट अवखळ ती शोधू कुठे, बाप माझा रडत गेला त्याची असवे शोधू कुठे, अशी आर्त हाक घालत तळीये गावातील माहेरवाशीण रडत बसली आहे. संपूर्ण कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही आता यायचे कुठे, आमच्या भावना व्यक्त करायच्या कुठे, असे एक ना अनेक प्रश्न येथील लेकीबाळींना पडले आहेत. गुरुवारी सायंकाळी कोसळलेल्या दरडीखाली गायब झालेल्या ग्रामस्थांच्या लेकीबाळी, मुले दुर्घटना समजल्यानंतर आकाशालाही पाझर फुटेल, अशा स्वरात हंबरडा फोडत रडत असल्याचे पाहून मन सुन्न झाले.
तळीये गावात ८५ ग्रामस्थ गावात होते. सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्यास सुरुवात होताच ग्रामस्थ एका घराच्या अंगणात येऊन थांबले होते. आपला संसार डोंगर गिळणार या कल्पनेने गावातून पायदेखील निघत नव्हता. पण पाठीमागे मृत्यू दिसत असल्याने पळायच्या तयारीत असणाऱ्या अबालवृद्ध, महिला व पुरुष यांना डोंगराने आपल्या मगरमिठीत ओढले. क्षणार्धात नांदत असलेला तळीये गाव डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गायब झाला. त्यामुळे मागे राहिलेल्या मुलांना आज आपले आई-वडील, नातेवाईक आपल्यामध्ये नसल्याचे दु:ख मोठ्या प्रमाणात झाले आहे.
किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला
नोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर असलेल्या चाकरमान्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावावर कोसळलेल्या संकटाची कल्पना येताच आपल्या घरच्यांच्या काळजीने जो-तो गावाकडे जाण्यास सुरू झाले. पण माणगावपर्यंत पुराच्या पाण्याने रस्ते अडकल्याने पुढे जाता येईना. पाणी ओसरण्याची वाट पाहत शेवटी घराकडे धाव घेतली. अनेक संकटांवर मात करीत कसाबसा रस्ता तुडवीत पोहोचलेल्या डोळ्यांना आपले गाव, वाडी, घरे शोधूनही सापडली नाहीत. पळत सुटलेल्या २२ जणांना सोबत घेऊन गेलेला डोंगर बौद्ध वाडीमध्ये थेट मृतदेहच हाती आले. एवढे मोठे ३२ घरांचे गावच्या गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली नाहीसे झाले. त्यामुळे मोठी जीवित व आर्थिक हानी झाली आहे. मात्र सोडून गेलेल्या नातेवाइकांना आता भेटायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.