आविष्कार देसाईरायगड : तळीयेमध्ये मृतदेह बाहेर काढताना कोणाचे हात तर कोणाचे पाय अशा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पण नातेवाईकांनी बचाव कार्य थांबवा, असे संमतीपत्र लिहून दिल्यास बचाव कार्य थांबविले जाईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. आतापर्यंत ४९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर दिवसभरात ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर ३६ जण अजून बेपत्ता आहेत.
बचाव कार्यादरम्यान मृतदेहाची अवहेलना पाहवत नाही. त्यामुळे यापुढे बचाव कार्य थांबविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आतापर्यंत ८५ जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. त्यामुळे बचावकार्य सुरूच राहणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले होते. त्यामुळे ग्रामस्थ संभ्रमात होते. सायंकाळी चौधरी बचावकार्य सुरू असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मृतदेहांची अवहेलना पाहवत नाही, ढिगाऱ्याखालून कोणाचे हात तर कोणाचे पाय मिळत आहेत, त्यामुळे बचाव कार्य थांबवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
सरकारी मदत, अन्य लाभ मिळण्यासाठी मृतदेह मिळणे आणि त्यांची ओळख पटणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आहे. चमत्कार होऊन एखादा माणूस जिवंत सापडला तर, त्याचा जीव वाचू शकतो, असे चौधरी यांनी सांगितले. त्यानंतर स्थानिक आमदार भरत गोगावले तेथे आले. त्यांनीही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाला संमतीपत्र दिले. तर बचावकार्य उद्यापासून थांबविले जाईल, असे चौधरी यांनी सांगितले.